राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय

दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासासंदर्भात कोलंबो सुरक्षा परिषदेची आभासी बैठक

Posted On: 19 APR 2022 7:12PM by PIB Mumbai

 

दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासादरम्यान आलेले अनुभव सामायिक करण्याच्या उद्देशाने भारतीय तपास संस्थेने 19 एप्रिल 2022 रोजी कोलंबो सुरक्षा परिषदेच्या आभासी बैठकीचे आयोजन केले. भारत, मालदीव, मॉरीशस, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतील विषयतज्ञ आणि प्रतिनिधी या आभासी बैठकीत सहभागी झाले.

मालदीव येथे 9 आणि 10 मार्च 2022 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाचव्या बैठकीमध्ये सदस्य देशांनी मंजूर केलेल्या कोलंबो राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या 2022-23 या वर्षासाठी सहकार्य आणि उपक्रमविषयक आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या अनेक एकत्रित उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे ही परिषद होय.

या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधींनी आपापल्या देशांतील दहशतवादाशी संबंधित विविध आव्हानांविषयी चर्चा केली आणि दहशतवादाशी संबंधित खटल्यांचे अनुभव, परदेशी हल्लेखोरांचा सामना करताना वापरण्याची धोरणे आणि इंटरनेट तसेच समाजमाध्यमांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठीचे उपाय यासंदर्भातील अनुभव सामायिक केले. बैठकीमध्ये उपस्थित तज्ञांनी दहशतवादी आणि मूलतत्ववाद्यांशी संबंधित प्रकरणांचा परिणामकारक तपास आणि खटल्यांच्या कार्यवाहीसाठीकोलंबो सुरक्षा परिषदेचे सदस्य तसेच निरीक्षक देशांदरम्यान अधिक सखोल सहकार्य आणि समन्वय साधण्यावर भर दिला.

कोलंबो सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून दहशतवाद आणि मूलतत्ववाद यांना अटकाव करण्याच्या बाबतीत सहकार्य यापुढेही कायम ठेवण्यासाठी विशिष्ट कार्यक्षेत्रे निश्चित केली पाहिजेत याबद्दल सहभागी देशांनी सहमती नोंदविली.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818136) Visitor Counter : 213