पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देवघर बचावकार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधानांचा संवाद

Posted On: 13 APR 2022 3:04PM by PIB Mumbai

 

आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी असलेले गृहमंत्री अमित शाह महोदय, खासदार निशिकांत दुबे जी, गृह सचिवलष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुखडीजीपी झारखंड, डीजी एनडीआरएफ, डीजी आयटीबीपी, स्थानिक प्रशासनातील सहकारी, आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी झालेले सर्व धाडसी जवान, कमांडो, पोलीस कर्मचारी आणि इतर सहकारी,

तुम्हा सर्वांना नमस्कार!

तुम्ही तीन दिवस, दिवसाचे चोवीसही तास कार्यरत राहून एक अतिशय अवघड बचावकार्य पूर्ण केले आणि अनेक देशवासियांचे जीव वाचवले आहेत. संपूर्ण देशाने तुमच्या साहसाची प्रशंसा केली आहे. बाबा वैद्यनाथजींची ही कृपा आहे असे देखील मी मानतो. काही सहकाऱ्यांचे जीव आम्ही वाचवू शकलो नाहीत, याचे खरेतर दुःख आहे. अनेक सहकारी जखमी देखील झाले आहेत. पीडित कुटुंबियांच्या पाठिशी आम्हा सर्वांच्या संपूर्ण संवेदना आहेत. सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो.

 

मित्रांनो,

ज्या कोणी ही कारवाई टीव्ही माध्यमांमधून पाहिली आहे ते सर्व आश्चर्यचकित झाले होते, चिंताग्रस्त झाले होते. तुम्ही सर्व तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी होता. तुमच्यासाठी ती सर्व परिस्थिती किती अवघड होती असेल, याची फक्त कल्पनाच करता येईल. पण आपले लष्कर, आपले हवाई दल, आपले एनडीआरएफचे जवान, आयटीबीपी चे जवान आणि पोलिस दलाचे जवान यांच्या रुपात अशी कुशल दले आहेत, जी देशवासीयांना प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढू शकतात, याचा देशाला अतिशय अभिमान आहे. ही दुर्घटना आणि या बचावकार्यातून आपल्याला अनेक धडे मिळाले आहेत. तुमचे अनुभव भविष्यात अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे कारण या सर्व मोहिमेशी दुरून सातत्याने संपर्कात होतो आणि प्रत्येक गोष्टीचा मी आढावा घेत होतो. पण तरीही तुमच्याकडून या सर्व घटनेची माहिती घेणे माझ्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

चला तर मग सर्वप्रथम आपण एनडीआरएफच्या धाडसी जवानांकडे जाऊया, पण एक गोष्ट मी सांगेन, एनडीआरएफने आपली एक ओळख निर्माण केली आहे आणि ही ओळख आपल्या कठोर परिश्रमांनी, आपल्या पुरुषार्थाने आणि आपल्या पराक्रमाने तयार केली आहे आणि यात एनडीआरएफचे जवान भारतात ज्या ज्या ठिकाणी आहेत, त्याचे हे परिश्रम आणि त्यांच्या या ओळखीसाठी देखील अभिनंदनाला पात्र आहेत.

तुम्ही अतिशय वेगाने काम केले आणि खूपच चांगल्या समन्वयाने काम केले, नियोजनाने काम केले ही अतिशय चांगली बाब आहे आणि मला पहिल्याच दिवशी अगदी पहिल्या दिवशीच संध्याकाळी बातमी मिळाली. नंतर अशी बातमी आली की हेलिकॉप्टर घेऊन जाणे अवघड आहे कारण हेलिकॉप्टरच्या कंपनांमुळे, त्याची जी हवा आहे त्यामुळे कदाचित तारा हलू लागल्या, ट्रॉलीतून लोक बाहेर फेकले गेले तर. त्यामुळे हेलिकॉप्टर घेऊन जाण्याचा विषय देखील चिंता निर्माण करणारा होता. त्यावरच रात्रभर चर्चा सुरू राहिली. पण त्यानंतरही मी पाहत आहे की ज्या समन्वयाने तुम्ही लोकांनी काम केले आहे आणि मला असे वाटते की अशा प्रकारच्या आपत्तींमध्ये वेळेचे, प्रतिसादाच्या वेळेचे अतिशय जास्त महत्त्व असते, वेळ हा एक महत्त्वाचा घटक असतो. तुमचा वेगच ही मोहीम यशस्वी होणार की अपयशी ते निश्चित करत असतो. गणवेशांवर लोकांचा खूप विश्वास असतो. आपत्तींमध्ये अडकलेले लोक ज्या ज्या वेळी तुम्हाला पाहतात, मग तो एनडीआरएफचा गणवेश असो आणि हा गणवेश तर आता ओळखीचा झाला आहे. तुम्ही लोक तर ओळखीचे आहातच आहात. तर मग त्यांना याची खात्री पटते की आता आपला जीव सुरक्षित आहे. त्यावेळी त्यांच्यात एक नवी आशा निर्माण होते. तुमची नुसती उपस्थितीच त्यांच्यामध्ये आशा निर्माण करण्याचे, धीर देण्याचे काम एका प्रकारे सुरू करते.

अशावेळी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक  असते. तुम्ही तुमच्या नियोजनात आणि कार्यान्वयनात याला खूप प्राधान्य दिले आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते केले आहे, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. तुमचे प्रशिक्षण उत्तम आहे. एक प्रकारे या क्षेत्रात समजले आहे कीतुमचे  प्रशिक्षण किती उत्तम आहे आणि तुम्ही किती साहसी आहात आणि  स्वतःला झोकून देत काम करण्यासाठी तुम्ही सज्ज असता. प्रत्येक अनुभवासह आम्ही देखील हे पाहतो आहे की तुम्ही लोक स्वतःला सक्षम  करत आहात. एनडीआरएफसह सर्व बचाव पथकांना आधुनिक विज्ञान, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करणे ही आमची वचनबद्धता आहे. हे संपूर्ण बचाव कार्य पूर्ण करताना संवेदनशीलता, समज आणि साहस दिसून आले. या अपघातातून वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो की, एवढ्या मोठ्या अपघातानंतरही तुम्ही समजुतीने वागलात. मला सांगण्यात आले की, लोकांनी बरेच तास लटकलेल्या स्थितीत घालवले, रात्रभर झोप नाही. तरीही, या सर्व बचावकार्य मध्ये त्यांनी दाखवलेला संयम, त्यांचे धैर्य हे एका बचावकार्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

तुम्हा सर्वांनी, सर्व नागरिकांनी हिंमत सोडली असती, तर इतक्या जवानांनी मेहनत घेऊनही कदाचित हे साध्य झाले नसते. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या धैर्यालाही मोठे महत्त्व आहे. तुम्ही  स्वतःला  सांभाळलेतलोकांना धैर्य दिलेत आणि बाकीचे काम आमच्या बचाव कर्मचार्‍यांनी पूर्ण केले. मला याचा आनंद आहे  की, त्या भागातील नागरिकांनी रात्रंदिवस चोवीस तास काम करून ज्या प्रकारे तुम्हा सर्वांना मदत केली, जी काही त्यांच्याकडे समज होती, साधने होती त्या आधारे तिथे जे जमेल ते करण्याचा त्यांनी  प्रयत्न केला. मात्र  या नागरिकांचे समर्पण मोठे होते. हे सर्व नागरिकही अभिनंदनाला पात्र आहेत. बघा, या आपत्तीने पुन्हा एकदा सिद्ध  केले आहे की, जेव्हा जेव्हा देशावर कोणतेही संकट येते तेव्हा आपण सर्वजण मिळून त्या संकटातून मार्ग काढतो आणि त्या संकटातून बाहेर पडून दाखवतो. या आपत्तीतही सर्वांच्याच प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. बाबा धामच्या स्थानिक लोकांचेही मी कौतुक करेन, कारण त्यांनी अशा प्रकारे पूर्ण मदत केली आहे. पुन्हा एकदा पीडित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींच्या प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या बचावकार्यामध्ये  सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांना माझे आवाहन आहे, कारण या प्रकारच्या बचावकार्यामध्ये, पूर, पाऊस, हे तुम्हाला नित्याचे आहे, मात्र अशा घटना फार दुर्मिळ आहेत. याबद्दल  तुम्हाला आलेला जो काही अनुभव आहे, तो अगदी वेगळ्या पद्धतीने लिहून काढा. एक प्रकारे तुम्ही हस्तलिखित  तयार करू शकता  आणि आपल्या  सर्व दलांनी  यात  काम केले आहे, एक दस्तऐवजीकरण झाले पाहिजे जेणेकरून अशा वेळी कोणती कोणती आव्हाने येतात हे भविष्यात  प्रशिक्षणाचा भाग राहील. ही आव्हाने हाताळण्यासाठी काय करावे लागेल, कारण पहिल्याच दिवशी संध्याकाळी मला सांगण्यात आले  की, सर हेलिकॉप्टर नेणे अवघड आहे कारण त्या वायर्स इतकी  कंपने  सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असेल याची मलाच चिंता वाटत होती. म्हणजेच अशा प्रत्येक टप्प्याची तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते अनुभवले आहे. जितक्या लवकर आपण त्याचे योग्य दस्तऐवजीकरण करू तितक्या लवकर आपण भविष्यात आपल्या सर्व यंत्रणांसाठी यासंदर्भातील पुढील प्रशिक्षणाचा भाग बनवू शकतो आणि आपण घटनेच्या अध्ययनाच्या रूपात त्याचा वापर सातत्याने करू शकतो. कारण आपल्याला सतत दक्ष राहावे लागेल. बाकी जी समिती स्थापन केली आहे, या रोपवे वगैरेचे काय झाले ते राज्य सरकार आपल्या बाजूने करेल. पण एक संस्था म्हणून आपल्याला या यंत्रणा देशभर विकसित करायच्या आहेत. तुम्हा  लोकांच्या शौर्याबद्दल, तुम्हा लोकांच्या प्रयत्नांसाठी, तुम्ही आपल्या नागरिकांसाठी ज्या संवेदनेने काम केले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद!

***

S.Thakur/S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817041) Visitor Counter : 175