संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग डीएफसी यांना भारतीय हवाई दलाची आदरांजली
Posted On:
15 APR 2022 12:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022
भारतीय हवाई दलातील दिग्गज हवाई योद्धा, मार्शल दिवंगत अर्जन सिंग (DFC) यांना त्यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त भारतीय हवाई दलाने आज,आदरांजली अर्पण केली तसेच मार्शल अर्जन सिंग यांनी देशासाठी आणि भारतीय हवाई दलासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी लायलपूर (आता पाकिस्तानातील फैसलाबाद) येथे झाला. वयाच्या 19 व्या वर्षी, त्यांची आरएएफ कॉलेज, क्रॅनवेल येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि डिसेंबर 1939 मध्ये ते रॉयल एअर फोर्समध्ये पायलट अधिकारी म्हणून नियुक्त झाले. 01 ऑगस्ट 1964 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी अर्जन सिंग यांनी हवाई दल प्रमुख (CAS) म्हणून पदभार स्वीकारला.
सप्टेंबर 1965 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले,ज्यामध्ये अखनूर या महत्त्वाच्या शहराला लक्ष्य केले होते. ,हवाई दलाकडून सहाय्य मिळवण्यासाठी त्यांना संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले आणि भारतीय हवाई दल किती लवकर युद्धास प्रत्युत्तर देण्यासाठी (ऑपरेशनसाठी) सज्ज होऊ शकतो असे विचारले असता, त्यांनी निडरपणे "...एका तासात" असे उत्तर दिले. आणि खरोखर, भारतीय हवाई दलाने एका तासात पाकिस्तानी आक्रमणाला भिडून, प्रतिहल्ला करत ,पाकिस्तानी हवाई दलावर (PAF) वर्चस्व मिळवले आणि भारतीय सैन्याला सामरिक विजय मिळवून देण्यात योगदान दिले.
1965 च्या युद्धात त्यांनी केलेल्या नेतृत्वासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जन सिंग हे भारतीय हवाई दलाचे पहिले एअर चीफ मार्शल बनले. जुलै 1969 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलाच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले.
त्यांच्या सेवेची दखल घेऊन, भारत सरकारने जानेवारी 2002 मध्ये अर्जन सिंग यांना मार्शल ऑफ द एअर फोर्स हा सन्मान प्रदान केला.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817016)
Visitor Counter : 435