पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 14 एप्रिल रोजी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करणार
आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी राष्ट्रउभारणीमध्ये दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासंदर्भातील पंतप्रधान मोदी यांच्या मनातील कल्पनेला अनुसरून या संग्रहालयाची संकल्पना आखण्यात आली आहे
हे संग्रहालय म्हणजे भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांना आदरांजली आहे; हे संग्रहालय देशाला लाभलेल्या सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताची कहाणी सांगते
संग्रहालयाचे बोधचिन्ह म्हणजे देश आणि लोकशाही यांचे प्रतीक असलेले धर्मचक्र पेलणाऱ्या भारतीय जनतेच्या हातांचे प्रतीक आहे
या संग्रहालयामध्ये तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण आहे ज्यातून संवादात्मक आणि गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर माहिती सादर होते
Posted On:
12 APR 2022 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या काळात सुरु होत असलेले हे संग्रहालय देशाला लाभलेल्या सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताची कहाणी सांगेल
राष्ट्रउभारणीमध्ये आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासंदर्भातील पंतप्रधान मोदी यांच्या मनातील कल्पनेला अनुसरून या संग्रहालयाची संकल्पना आखण्यात आली असून हे पंतप्रधान संग्रहालय म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांना त्यांची विचारसरणी आणि कार्यकाळ यांना गृहीत ना धरता वाहिलेली आदरांजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेला हा समावेशक प्रयत्न असून आपल्या सर्व पंतप्रधानांचे नेतृत्व, द्रष्टेपणा आणि त्यांनी केलेली सफल कामगिरी याबद्दल नव्या पिढीला जागृत करून त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे.
जुन्या आणि नव्या गोष्टींचा सुंदर मिलाफ दर्शवत, या संग्रहालयात पूर्वीचे तीन मूर्ती भवन ब्लॉक 1 म्हणून तर नव्याने बांधलेली इमारत ब्लॉक 2 म्हणून दाखविण्यात आली आहे. या दोन्ही ब्लॉक्सचे एकत्रित क्षेत्रफळ 15,600 चौरस मीटरहून अधिक आहे.
या संग्रहालयाच्या इमारतीची रचना उदयोन्मुख भारताच्या तसेच स्वहस्ते त्याला आकार देणाऱ्या आणि घडविणाऱ्या नेत्यांच्या कहाणीतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. या इमारतीच्या संरचनेत शाश्वत आणि उर्जा संवर्धन प्रक्रिया अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या कामादरम्यान एकही वृक्ष तोडण्यात आला नाही किंवा त्याचे प्रत्यारोपण करावे लागले नाही. संग्रहालयाचे बोधचिन्ह म्हणजे देश आणि लोकशाही यांचे प्रतीक असलेले धर्मचक्र पेलणाऱ्या भारतीय जनतेच्या हातांचे प्रतीक आहे.
या संग्रहालयासाठी आवश्यक असणारी माहिती प्रसार भारती, दूरदर्शन, चित्रपट विभाग, सांसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय तसेच परदेशी माध्यम संस्था, परदेशी वृत्त संस्था इत्यादींकडे असणारे माहितीचे भांडार आणि विविध स्रोत यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे. पुराभिलेख दस्तावेजांचा योग्य वापर (संग्रहित कार्य आणि इतर साहित्यविषयक कार्य, महत्वाचे पत्रव्यवहार), काही वैयक्तिक वापराच्या वस्तू, भेट मिळालेल्या वस्तू तसेच आठवणी सांगणारी इतर सामग्री (सत्कार समारंभ, मानसन्मान, मिळालेली पदके, सन्मानार्थ विशेष प्रसंगी प्रकाशित टपाल तिकिटे, नाणी, इत्यादी), पंतप्रधानांची भाषणे आणि विविध विचारधारांचे घटनात्मक प्रातिनिधिक साहित्य तसेच विविध पंतप्रधानांच्या आयुष्यांचे विविध पैलू या संग्रहालयात संकल्पनाधारित स्वरुपात दर्शविण्यात आले आहेत.
या संग्रहालयामध्ये सामग्रीमधील वैविध्य आणि प्रदर्शनाच्या सतत परिभ्रमणाचे भान ठेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण करण्यात आले आहे. ज्यातून संवादात्मक आणि गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर माहिती सादर होते. होलोग्राम्स, आभासी सत्यता, वर्धित सत्यता, बहु-स्पर्शी, विविध माध्यमे, संवादात्मक किऑस्क, संगणकीकृत गतिजन्य शिल्पे, स्मार्टफोन अॅप्लीकेशन्स, संवाद साधणारे पडदे, अनुभवात्मक संरचना इत्यादींमुळे या प्रदर्शनातील साहित्य मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी संवाद साधणारे आणि त्यांना गुंतवून ठेवणारे झाले आहे.
या संग्रहालयात एकूण 43 दालने आहेत. स्वातंत्र्य लढ्यावर तसेच घटनेच्या रचनेवर आधारित काही माहितीच्या सादरीकरणापासून सुरु होऊन हे संग्रहालय आपल्याला, अनेकानेक पंतप्रधानांनी विविध आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या देशाला योग्य दिशा कशी दाखवली आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी सुनिश्चित केली याची कथा सांगते.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816172)
Visitor Counter : 331
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam