गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे “अमृत समागम” या देशभरातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन
Posted On:
12 APR 2022 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022
केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या “अमृत समागम” या देशभरातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन केले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या काळात ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी लढा दिला त्यांचा त्याग आणि खंबीरपणा याविषयी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या नव्या पिढीला माहिती द्यायला हवी.
केंद्रीय मंत्री म्हणाले की 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी गांधी आश्रम येथून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सोहोळ्याची सुरुवात केली होती, त्यानंतर देशात या संदर्भात 25,000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे कठीण परिस्थिती उद्भवली आणि त्यामुळे अनेक कार्यक्रम मिश्र पद्धतीने आयोजित करावे लागले. त्याचा परिणाम म्हणून या कार्यक्रमांमध्ये म्हणावा तसा लोकसहभाग मिळवता आला नाही. पण आता आपला देश कोविड-19 च्या विळख्यातून बाहेर पडत आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उरलेला काळ आपण मोठ्या लोकसहभागाने साजरा केला पाहिजे असे ते म्हणाले. देशातील प्रत्येक गाव, तहसील, जिल्हा, आणि हरेक राज्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सोहोळ्यात कशा प्रकारे सहभागी होईल आणि त्यासाठी कार्यक्रम निर्मिती करून ते यशस्वी कसे करता येतील हे आपल्याला या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये निश्चित करायचे आहे असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ब्रिटीशांच्या विरुध्द अनेक मार्गांनी स्वातंत्र्य लढा लढण्यात आला आणि 1857 ते 1947 या काळातील स्वातंत्र्य संग्रामाच्या कथांनी पुन्हा एकदा आपल्या आगामी पिढ्यांची माने जागृत व्हायला हवी. केवळ इतिहास ही सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. ते म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटना आणि शूर वीरांची चरित्रे तरुणांसमोर जिवंतपणे उभी करायला हवी तेव्हाच हे तरुण स्वतःला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेऊ शकतील आणि म्हणूनच या नव्या पिढीच्या मनांमध्ये राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेची बीजे रुजवून एक अशी नवी पिढी निर्माण करायची आहे जी संपूर्ण जीवनभर या प्रेरणेतून देशासाठी कार्य करणे सुरु ठेवेल.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, या दोन दिवसांच्या चर्चासत्रादरम्यान आपण अमृत महोत्सव सोहोळ्याअंतर्गत राज्यांतील काही जागा अशा पद्धतीने विकसित केल्या पाहिजेत ज्या लोकांच्या सजगतेचे केंद्र होतील. समाजात अशा संकल्पांचा प्रसार करा जे अनेक लोकांना प्रेरणा देतील, उदाहरणार्थ, मी शिक्षित आहे आणि मी प्रौढ निरक्षरांना शिक्षण देईन असा सल्ला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816165)
Visitor Counter : 277