कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी देशातील निवृत्तीवेतनधारक आणि सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिकांना लाभदायक ठरणाऱ्या एक खिडकी पोर्टलच्या उभारणीची केली घोषणा

Posted On: 12 APR 2022 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान(स्वतंत्र प्रभार), कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह  यांनी आज निवृत्तीवेतनधारक आणि सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिकांना लाभदायक ठरणाऱ्या एक खिडकी पोर्टलच्या उभारणीची घोषणा केली. ते म्हणाले की हे पोर्टल देशभरातील निवृत्तीवेतन धारक आणि त्यांच्या संघटना यांच्या दरम्यान सतत संपर्क शक्य तर करेलच पण त्याचबरोबर या नागरिकांकडून येणारी माहिती, सूचना तसेच तक्रारी यांची देखील तात्काळ प्रतिसादासाठी नोंद घेईल.

निवृत्तीवेतन नियम म्हणजेच (सीसीएस) (निवृत्तीवेतन) नियम,2021चा आढावा आणि सुसूत्रीकरण यासाठी स्वेच्छा संस्थांच्या स्थायी समितीच्या 32 व्या बैठकीला संबोधित करताना डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार, सामान्य माणसांच्या जीवन जगण्यात सुलभता आणण्याच्या उद्देशाने 2014 पासून निवृत्तीवेतनसंबंधी नियमांमध्ये अनेक क्रांतिकारक बदल करण्यात आले.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत विविध अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात भेटल्याशिवाय त्या सोडविता येण्यासाठी एक खिडकी डिजिटल यंत्रणा उपलब्ध करून देणे हा या सामायिक निवृत्तीवेतन पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. निवृत्तीवेतन मिळण्यासाठी योग्य प्रक्रिया अनुसरणे, निवृत्तीवेतन मंजूर करणे किंवा त्यासंदर्भातील प्रलंबित देय रक्कम वितरीत करणे यासाठी जबाबदार असणारी सर्व मंत्रालये या पोर्टलच्या प्रणालीत एकमेकांशी जोडण्यात आली असून योग्य मूल्यमापनानंतर  या पोर्टलवर नोंदलेल्या तक्रारी सोडवणुकीसाठी संबंधित मंत्रालये आणि विभागांकडे पाठविल्या जात आहेत. निवृत्तीवेतनधारक आणि नोडल अधिकारी, या तक्रारींची सोडवणुक होईपर्यंत दरम्यानच्या काळात या तक्रारीची सत्यस्थिती ऑनलाईन जाणून घेऊ शकणार आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ज्ञान, अनुभव आणि प्रयत्न निवृत्तीवेतन विभाग आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणाच्या कार्याचे मूल्यवर्धन करण्यात उपयुक्त असल्यामुळे आपण त्याचा उत्तमरित्या उपयोग करून घेण्यावर भर द्यायला हवा असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

नोव्हेंबर 2020 पासून पोस्टमनच्या मदतीने निवृत्तीवेतनधारकांपर्यंत जाऊन हयातीचा  दाखला डिजिटल पद्धतीने सादर करण्याच्या पद्धतीची सुरुवात झाल्यापासून भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून 3,08,625 हून अधिक हयातीचे दाखले सादर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

निवृत्तीवेतनधारकांच्या जीविताचे दाखले डिजिटल पद्धतीने सादर करण्यासाठी अँड्रॉइड फोनच्या वापराने चेहेरा प्रमाणीकरण करण्याचे तंत्र 29 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु करण्यात आले आणि आतापर्यंत या पद्धतीच्या वापरातून 20,500 हयातीचे  दाखले देण्यात आले आहेत असे ते म्हणाले.

निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी अधिकृत आणि समाज माध्यम वाहिन्यांच्या माध्यमातून या उपक्रमाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

 

 

 

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816105) Visitor Counter : 248