वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारांतर्गत द्विपक्षीय व्यापार पाच वर्षांत 50 अब्ज पर्यंत वाढण्याच्या प्रारंभिक अपेक्षांच्या तुलनेत, अत्यंत वेगाने वाढून सध्याच्या 26-27 अब्ज डॉलर्सवरून 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल - पियूष गोयल
आम्ही तुम्हाला पारदर्शकता, विश्वास आणि कायद्याचे राज्य प्रदान करू असे सांगत गोयल यांचे ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण
Posted On:
06 APR 2022 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2022
भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारांतर्गत द्विपक्षीय व्यापार पाच वर्षांत 50 अब्ज पर्यंत वाढण्याच्या सुरुवातीला व्यक्त केलेल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगाने वाढून तो सध्याच्या 26-27 अब्ज डॉलर्सवरून 2030 पर्यंत 100 अब्जपर्यंत पोहोचेल, असे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. या करारामुळे निर्माण झालेल्या उत्साहामुळे, दोन्ही बाजूंनी व्यावसायिक आशावाद वाढला आहे, असे ते आज मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन टेहान यांच्यासह मेलबर्न विद्यापीठात संबोधित करताना म्हणाले.
मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. “आम्ही तुम्हाला पारदर्शकता, आमचा विश्वास, कायद्याचे राज्य प्रदान करू. आपण दोन लोकशाही असलेले देश आहोत, दोन्ही देशामधील लोकांना खेळ आवडतो, दोन्ही देश राष्ट्रकुल सदस्य आहोत.'' असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर उभय देशांतील उद्योग समुदायाच्या सदस्यांनाही संबोधित केले.भारताची मोठी बाजारपेठ आणि ऑस्ट्रेलियाचे गुंतवणूक करण्यायोग्य अधिक्य यांसारख्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील परस्परपूरकतेमुळे दोन्ही देशांना फायदा होऊ शकतो, असे गोयल म्हणाले. भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (IndAus ECTA) भारतातील सुमारे 1.4 अब्ज ग्राहकांची मोठी बाजारपेठ ऑस्ट्रेलियन उद्योगांसाठी खुली करेल ,असे त्यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग, औषधोत्पादन, आदरातिथ्य, रत्ने आणि आभूषणे, माहिती आणि तंत्रज्ञान, स्टार्टअप्स इत्यादी आणि सेवांमधील लेखाशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता असून यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड रोजगार निर्माण होईल, असे गोयल यांनी सांगितले.
सेवा क्षेत्रामध्ये व्यापाराला मोठा वाव आहे. ऑस्ट्रेलिया हे बहुतांश भारतीयांसाठी उच्च शिक्षणासाठी पसंतीचे ठिकाण असताना, भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारामुळे भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा ऑस्ट्रेलियात विस्तार होण्यामधील मोठा अडथळा दूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे गोयल म्हणाले.
त्यानंतर, ऑस्ट्रेलिया इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एआयसीसी) वतीने मेलबर्न येथे आयोजित केलेल्या उद्योजकांसह स्नेहभोजना दरम्यान मुख्य भाषण देताना, गोयल यांनी सांगितले की, भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार हा एक महत्त्वाचा टप्पा असून बहु-क्षेत्रीय आर्थिक मूल्य साखळींच्या व्यापक विकासात योगदान देईल. दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा लक्षणीय सकारात्मक आर्थिक परिणाम होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना गोयल म्हणाले की, दोन्ही राष्ट्रांमधील प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेला व्यापार करार मर्यादित कालावधीत पूर्ण करण्यात ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे व्यापारसंदर्भातील विशेष दूत टोनी अॅबॉट आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री डॅन टेहान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तत्पूर्वी, मेलबर्न येथे क्रिकेटपटू दिवंगत शेन वॉर्न यांना गोयल यांनी श्रद्धांजली वाहिली, शेन वॉर्न यांचे भारतातही चाहते आहेत आणि ‘फिरकीचा राजा' असेलल्या वॉर्न यांच्या आकस्मिक निधनाने लाखो क्रिकेट चाहत्यांनी शोक व्यक्त केला, असे ते म्हणाले.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814245)