वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारानंतर (ईसीटीए) पियुष गोयल ऑस्ट्रेलियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

Posted On: 05 APR 2022 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022 

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पियुष   गोयल आज ऑस्ट्रेलियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी  नवी दिल्लीहून रवाना झाले.शनिवार, 2 एप्रिल रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आर्थिक सहकार्य आणि व्यापार  (भारत ऑस्ट्रेलिया ईसीटीए) करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लगेचच ते या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान, मी  लोकांपर्यंत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार घेऊन जाईन असे गोयल म्हणाले. उद्योजक, भारतीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय  इत्यादींशी संवादाचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले

या दौऱ्या दरम्यान  गोयल आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार पुढे नेण्याबाबत त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन टेहान   यांच्याशी व्यापक चर्चा करतील. आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार हा एका दशकाहून अधिक काळानंतरचा भारताचा विकसित देशासोबतचा पहिला व्यापार करार आहे आणि हा करार उभय देशांमधील व्यापार सुधारण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा प्रदान करतो.  गोयल आज संध्याकाळी ऑस्ट्रेलियाच्या  पंतप्रधानांचे विशेष व्यापार दूत   टोनी अॅबॉट यांच्याशी चर्चा करतील.

त्याच्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकात, गोयल उद्या मेलबर्न विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलिया भारत संस्थेला भेट देतील. ते मेलबर्न विद्यापीठातील मेलबर्न लॉ स्कूलमध्ये मंत्री डॅन टेहान आणि मेलबर्न विद्यापीठाचे कुलपती अॅलन मायर्स यांच्यासोबत  जनसंवाद कार्यक्रमाला  संबोधित करतील.

गोयल ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट देतील आणि भारतीय प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याबरोबरच मंत्री डॅन टेहान यांच्यासह ऑस्ट्रेलिया-इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऑस्ट्रेडला संबोधित करतील.नंतर ते मेलबर्नमधील शिव विष्णू मंदिराला भेट देतील आणि अनिवासी भारतीयांसोबतच्या   एका समुदाय कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

ऑस्ट्रेलियन कृषी उत्पादकांना गोयल भेटतील आणि पर्थमध्ये डेप्युटी प्रिमियर रॉजर कुक आणि  शॅडो मंत्रिमंडळातील व्यापार मंत्री मॅडलिन किंग, यांच्याशी ते चर्चा करतील.ते पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट मैदानाला  (डब्ल्यूएसीए) भेट देणार आहेत. आणि टूरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने आयोजित पर्यटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून भारतीय माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पियुष गोयल कम्युनिटी सेंटर इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला (आयएसडब्ल्यूए)  संबोधित करतील.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813781) Visitor Counter : 279