राष्ट्रपती कार्यालय

मध्य आशियाई देशांशी संपर्कव्यवस्था ही भारताची प्रमुख प्राधान्यक्रमाची बाब: राष्ट्रपती कोविंद


अश्गाबात येथील आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेत तुर्कमेनिस्तानच्या तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे संबोधन

Posted On: 03 APR 2022 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2022

 

मध्य आशियाई देशांशी संपर्कव्यवस्था ही भारताचे प्रमुख प्राधान्यक्रमाची बाब आहे असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सांगितले. ते आज (३ एप्रिल २०२२) अश्गाबात येथील आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेत तुर्कमेनिस्तानच्या तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. राष्ट्रपती म्हणाले की, भारत हा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका आणि अश्गाबात करार या दोन्हींचा सदस्य आहे. इराणमधील चाबहार बंदर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत जी मध्य आशियाई देशांना समुद्रात सुरक्षित, व्यवहार्य आणि विना अडथळा प्रवेशाची सोय उपलब्ध करू शकतात. ते म्हणाले की, संपर्कव्यवस्थांचा विस्तार करताना, सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखून,  संपर्कव्यवस्थेचे प्रकल्प हे सल्लामसलतीद्वारे तयार झालेले, पारदर्शक आणि सर्वांना सहभागी करून घेणारे असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. या प्रदेशात सहकार्य, गुंतवणूक आणि कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी भारत तयार आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, तुर्कमेनिस्तान ‘अर्काडागच्या लोकांचे युग’ म्हणून वाटचाल करत असताना, भारत एक दीर्घकालीन मित्र म्हणून आपल्या लोकांची सामूहिक स्वप्ने साकार करण्यासाठी त्याच्यासोबत भागीदारी करण्यास तयार आहे. तुर्कमेनिस्तानच्या भेटीमुळे उभय देशांमधील भागीदारीला आणखी चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी राष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय संबंध संस्था येथे ‘भारतीय दालनाचे’ उद्घाटनही केले. भारताशी संबंधित उपक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये भारताविषयी रुची निर्माण करण्यासाठी ‘भारतीय दालनाची’ निर्मिती करण्यात आली आहे. भारत सरकारने ‘भारतीय दालन’ सुसज्ज करण्यासाठी संगणक, भारतावरील पुस्तके आणि वाद्ये आणि इतर साहित्य दिले आहे.

सकाळी, राष्ट्रपतींनी अश्गाबात येथील पीपल्स मेमोरियल कॉम्प्लेक्सला भेट दिली आणि तेथील चिरंतन गौरव स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी बागत्यार्लिक क्रीडा संकुलालाही भेट दिली जिथे त्यांनी महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्यासमोर पुष्पांजली अर्पण केली आणि भारतीय प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली तुर्कमेन लोकांच्या योग प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.

तुर्कमेनिस्तान आणि नेदरलँड दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती उद्या सकाळी (4 एप्रिल, 2022) नेदरलँड्सला रवाना होतील.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी इथे क्लिक करा

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1813008) Visitor Counter : 220