वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (ईसीटीए) स्वाक्षरी
या करारामुळे लोकांचा परस्परांमधील संपर्क वाढून अतिरिक्त व्यवसायांची निर्मिती, निर्यातीत लक्षणीय वाढ आणि दहा लाखांहून अधिक रोजगार निर्मिती
Posted On:
02 APR 2022 6:40PM by PIB Mumbai
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत आज भारत सरकारमधील केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधील व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुक मंत्री डॅन तेहान यांनी आभासी समारंभाच्या माध्यमातून भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (“भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए”) स्वाक्षरी केली.
भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए कराराची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
2. भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए करार हा एका दशकाहून अधिक काळानंतर भारताचा विकसित देशासोबत झालेला पहिला व्यापार करार आहे. या करारामध्ये दोन्ही मित्र राष्ट्रांमधील द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रातील सहकार्य समाविष्ट आहे त्याचप्रमाणे मालाचा व्यापार, उत्पादनाच्या मूळ देशाचे नियम, सेवांचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे (टीबीटी), स्वच्छताविषयक आणि फायटोसॅनिटरी (एसपीएस) उपाययोजना, वादविवादांचा निपटारा, व्यक्तींची ये-जा, दूरसंचार, सीमाशुल्क प्रक्रिया, औषध उत्पादने आणि इतर क्षेत्रातील सहकार्यही या करारात समाविष्ट आहे. या कराराचा एक भाग म्हणून द्विपक्षीय आर्थिक सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश असलेल्या आठ विशिष्ट विषय आधारित पत्रांचीही पूर्तता करण्यात आली आहे.
परिणाम किंवा फायदे:
3. ईसीटीए करार उभय देशांमधील व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यापारात सुधारणा होण्याच्या दृष्टीने संस्थात्मक यंत्रणा प्रदान करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ईसीटीए करारामध्ये अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाद्वारे व्यवहार केलेल्या जवळपास सर्व शुल्क व्यवस्था समाविष्ट आहेत.ऑस्ट्रेलियाने 100% शुल्क व्यवस्थेवर प्रदान केलेल्या प्राधान्यक्रमाच्या बाजार प्रवेशाचा भारताला फायदा होईल.यामध्ये रत्ने आणि दागिने, कापड, चामडे, पादत्राणे, फर्निचर, खाद्यपदार्थ आणि कृषी उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि वाहन क्षेत्र यांसारख्या भारताला निर्यातीसाठी स्वारस्य असलेल्या सर्व श्रम-केंद्रित क्षेत्रांचा समावेश आहे.दुसरीकडे, भारत त्याच्या 70% पेक्षा अधिक शुल्क व्यवस्थेवर ऑस्ट्रेलियाला प्राधान्याने प्रवेश प्रदान करेल, यात ऑस्ट्रेलियाला निर्यातीत स्वारस्य असलेल्या प्रामुख्याने कच्चा माल आणि कोळसा, खनिज धातू आणि वाइन इ.वस्तूंचा समावेश आहे.
4. सेवांमधील व्यापाराच्या संदर्भात,ऑस्ट्रेलियाने सुमारे 135 उपक्षेत्रांमध्ये आणि सर्वाधिक पसंतीच्या देशांमधील 120 उपक्षेत्रांमध्ये व्यापक वचनबद्धता दर्शवली आहे यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा., व्यवसाय सेवा, आरोग्य, शिक्षण आणि ध्वनी चित्र यासारख्या भारताच्या स्वारस्याची प्रमुख क्षेत्रे समाविष्ट आहेत. सेवा क्षेत्रात ऑस्ट्रेलियातील देऊ केलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये पुढील क्षेत्रे समाविष्ट आहेत : स्वयंपाकी आणि योग शिक्षकांसाठी कोटा; भारतीय विद्यार्थ्यांसाठी परस्पर आधारावर 2-4 वर्षांचा अध्ययन पश्चात कार्य व्हिसा; व्यावसायिक सेवा आणि इतर परवानाकृत/नियमित व्यवसायांना परस्पर मान्यता; आणि तरुण व्यावसायिकांसाठी कार्य आणि सुट्टीसाठी व्हिसाची व्यवस्था. दुसरीकडे, व्यवसाय सेवा', 'संप्रेषण सेवा', 'बांधकाम आणि संबंधित अभियांत्रिकी सेवा', आणि अशाच प्रकारच्या सेवांसाठी भारताने ऑस्ट्रेलियाला सुमारे 103 उप-क्षेत्रांमध्ये आणि सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्रामधील 11 व्यापक सेवा क्षेत्रांमधून 31 उप-क्षेत्रांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या कराराअंतर्गत औषधोत्पादनांवर स्वतंत्र परिशिष्ट तयार करण्यासही दोन्ही बाजूनी सहमती दर्शवण्यात आली असून यामुळे पेटंट, जेनेरिक आणि बायोसिमिलर औषधांसाठी जलद मंजुरी मिळण्यास मदत होईल.
कालावधी :
5. भारत-ऑस्ट्रेलिया ईसीटीए करारासाठी औपचारिकपणे 30 सप्टेंबर 2021 रोजी पुन्हा वाटाघाटी सुरू करण्यात आल्या आणि मार्च 2022 च्या अखेरीस जलदगतीने पूर्ण झाल्या.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812791)
Visitor Counter : 558