युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
कर्नाटकचे राज्यपाल टी सी गेहलोत आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बेंगळुरू येथे खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा 2021 चा लोगो, मस्कॉट, जर्सी आणि स्पर्धागीताचे केले अनावरण
खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तरुणांनी उत्साहाने सहभागी व्हावे: टी सी गेहलोत
खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा हे ऑलिम्पिकसाठी प्रतिभावान खेळाडू निवडण्याचे व्यासपीठ: अनुराग ठाकूर
Posted On:
01 APR 2022 6:10PM by PIB Mumbai
कर्नाटकचे राज्यपाल, टी सी गेहलोत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि अनेक मान्यवरांनी खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा 2021 (KIUG 2021) चा लोगो, मस्कॉट, जर्सी आणि स्पर्धागीताचे बेंगळुरूच्या श्री कांतीरवा क्रीडांगणावर अनावरण केले. गेल्यावर्षीच्या कोविड संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे ओदिशाने 2020 मध्ये खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यानंतरचा दुसरा टप्पा असेल. यावेळी स्पर्धेची अद्ययावत माहिती देण्यासाठी खेलो इंडिया अॅपचे देखील यजमान राज्य कर्नाटकने उदघाटन केले. गेहलोत यांनी क्रीडा स्पर्धेचा लोगो आणि अधिकृत मस्कॉट - 'वीराचे' तर ठाकूर यांनी खेळांची अधिकृत जर्सी तसेच चंदन शेट्टी आणि निखिल जोशी यांनी गायलेल्या स्पर्धागीताचे अनावरण केले. कर्नाटकचे रेशीम, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री डॉ. के.सी. नारायण गौडा, कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायण सीएन आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कर्नाटकचे राज्यपाल टीसी गेहलोत यांनी आपल्या भाषणादरम्यान, खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या (KIUG) दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यासाठी कर्नाटकची निवड केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. गेहलोत पुढे म्हणाले की खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडियाच्या स्वप्नातील कार्यक्रमाचा एक भाग आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती चांगली कामगिरी केली होती आणि खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा देशाच्या क्रीडा कौशल्यात कशी भर घालतील यावरही त्यांनी प्रकाश टाकला. गेहलोत यांनी तरुणांना खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि खेळाबाबत जनजागृती केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, "खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा हे एक व्यासपीठ आहे ज्याद्वारे आशियाई खेळ, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठी प्रतिभावान खेळाडू निवडण्याचा आमचा मानस आहे. यावर्षी भारतभरातील 20 खेळांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 4500 खेळाडू सहभागी होणार आहेत आणि मला विश्वास आहे की आगामी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील असे काही खेळाडू आम्हाला यातून गवसतील."

खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेला हरित खेळ घोषित केल्याबद्दल ठाकूर यांनी राज्याचे अभिनंदन केले. "खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा बेंगळुरू हरित खेळ एक वेगळी दिशा देणारा आहे कारण तुम्ही केवळ खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध नाही, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही वचनबद्ध आहात. तेही अशा वेळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला पर्यावरण क्षेत्रात नेतृत्वाच्या भूमिकेकडे नेत आहेत." खेळाच्या मैदानाबाहेर खेळांमध्ये वापरल्या जाणार्या सर्व गोष्टी पुन्हा वापरता येण्याजोग्या साहित्यापासून बनवल्या जातील, शिवाय वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरली जातील आणि प्रत्येक ठिकाणी सर्व कचरा ओला आणि सुका म्हणून वेगळा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त क्रीडा स्पर्धा असतील.

खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदाच होणार आहेत. त्यापैकी 20 क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा श्रेणीत योगासन आणि मल्लखांब यांचा समावेश आहे. या निर्णयाबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, "भारताला हजारो वर्षांचा क्रीडा इतिहास आहे आणि आमच्या जुन्या क्रीडा प्रकारांना चालना देण्याचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन हा जगभरात साजरा होत आहे आणि या वर्षी आमच्या मंत्रालयाने योगासनाला एक खेळ म्हणून मान्यता दिली आहे. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की या वर्षीच्या खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोन पारंपरिक खेळ असतील आणि ग्रामीण आणि स्थानिक खेळांना वर्षभर निधी देण्यासाठी एक ठोस योजना आहे."
शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच खेळांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सक्रिय भूमिकेबद्दल ठाकूर यांनी खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेचे यजमान विद्यापीठ जैन विद्यापीठाचे अभिनंदन केले आणि भारतातील अधिक विद्यापीठांनी त्यांच्या आवारात खेळांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगितले. विद्यापीठस्तरावरील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारतीय विद्यापीठांच्या संघटनेचेही अभिनंदन केले.
उद्घाटनाचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या 3000 विद्यार्थी समुदायाला संबोधित करताना ठाकूर म्हणाले. “जेव्हा क्रीडा, शिक्षण आणि पर्यावरणाचा विचार केला जातो तेव्हा तरुण हा सर्वात मोठा वर्ग डोळ्यासमोर असतो. देशाचे वर्तमान आणि भविष्य युवा पिढी असल्याने या समस्यांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची आहे.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812586)
Visitor Counter : 422