पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


येत्या 25 वर्षांच्या अमृत काळात देशाच्या विकासात तुमची तुकडी महत्वाची भूमिका बजावेल-पंतप्रधान

महामारी नंतर नव्याने उदयाला येणाऱ्या जागतिक व्यवस्थेत भारताला आपली भूमिका वाढवण्याबरोबरच वेगाने विकासही साध्य करायचा आहे

आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक भारत ही 21 व्या शतकातली आपल्यासाठीची सर्वात मोठी उद्दिष्टे, आपणही याचे सदैव स्मरण ठेवा

सेवेच्या आपल्या कार्यकाळात, वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाच्या मोजमापासाठी सेवा आणि कर्तव्य हे घटक असले पाहिजेत

या अमृत काळात रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री आपल्याला नव्या उंचीवर न्यायची आहे, म्हणूनच आजचा भारत ‘सबका प्रयास’ या भावनेने वाटचाल करत आहे

आपल्याकडे सोपी कामगिरी येऊ नये अशी इच्छा बाळगावी

सोपी कामगिरी घेण्याचा जितका विचार तुम्ही कराल तितकीच तुमच्या आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल

Posted On: 17 MAR 2022 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नव्या क्रीडा संकुलाचे त्यांनी उद्‌घाटन केले आणि पुनर्रचित हॅपी व्हाली कॉम्प्लेक्स राष्ट्राला अर्पण केले.

अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल या अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि आनंदाचा सण असलेल्या होळीच्या पर्वानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही तुकडी प्रत्यक्ष सेवेत दाखल होते आहे हे या तुकडीचे आगळे वैशिष्ट्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येत्या 25 वर्षांच्या अमृत काळात देशाच्या विकासात तुमची तुकडी महत्वाची भूमिका बजावेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

महामारी नंतर नव्याने उदयाला येणारी जागतिक व्यवस्था त्यांनी अधोरेखित केली. 21 व्या शतकात या वळणावर जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. भारताला आपली भूमिका वाढवण्याबरोबरच वेगाने विकासही साध्य करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक भारत ही 21 व्या शतकातली आपल्यासाठीची सर्वात मोठी उद्दिष्टे असून या काळाचे महत्व आपणही सदैव स्मरणात ठेवावे असे आवाहन त्यांनी या अधिकाऱ्यांना केले. आपण ही संधी गमावता कामा नये असेही ते म्हणाले.

प्रशासकीय सेवेबाबत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की सेवा आणि कर्तव्य भावना हा प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. सेवेच्या आपल्या संपूर्ण कार्यकाळात सेवा आणि कर्तव्य हे  आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचे मोजमाप करणारे घटक असायला हवेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

कर्तव्य भावनेने आणि उद्देशाने जेव्हा काम केले जाते तेव्हा त्याचे ओझे वाटत नाही. एका उद्देशाने आणि देश आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा आपण एक भाग असावे आपण या भावनेने सेवेत आला आहात असे ते म्हणाले.

प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरचा अनुभव घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली कारण फाईल मधल्या मुद्यांचा खरा अनुभव तेव्हाच येतो असे ते म्हणाले. फाईल मध्ये केवळ आकडेवारी नसते तर लोकांच्या आशा-आकांक्षा त्यात एकवटलेल्या असतात. आपल्याला त्या आकड्यांसाठी नव्हे तर जनतेच्या जीवनासाठी काम करायचे  आहे. अधिकाऱ्यांनी, समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी समस्येच्या मुळाशी गेले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. या अमृत काळात रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री आपल्याला नव्या उंचीवर न्यायची आहे, म्हणूनच आजचा भारत ‘सबका प्रयास’ या  भावनेने वाटचाल करत आहे. आपल्या प्रत्येक निर्णयाचे मूल्यमापन हे समाजाच्या तळाशी असलेल्या व्यक्तीच्या कल्याणाच्या कसोटीवर केले पाहिजे या महात्मा गांधी यांच्या मंत्राचे त्यांनी स्मरण केले.

या अधिकाऱ्यानी आपल्या जिल्ह्यातल्या स्थानिक स्तरावरच्या 5-6 समस्या ओळखून त्यांच्या निराकरणासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. समस्या ओळखणे हे समस्या निराकरणाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. यासाठी त्यांनी गरिबांसाठी पक्की घरे आणि वीज जोडणी देण्याच्या आव्हानाचे उदाहरण दिले. या  समस्यांच्या निराकरणासाठी पीएम आवास योजना, सौभाग्य योजना आणि आकांक्षी जिल्हा यासारख्या योजना आणल्याचे त्यांनी सांगितले. विविध पायाभूत प्रकल्पांच्या समन्वयाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. पीएम गतीशक्ती मास्टर प्लान या संदर्भात दखल घेईल असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय सेवेतल्या मिशन कर्मयोगी आणि आरंभ यासारख्या नव्या सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याकडे सोपी कामगिरी येऊ नये अशी इच्छा बाळगावी. सोपी कामगिरी घेण्याचा जितका विचार तुम्ही कराल तितकीच तुमच्या आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल, असे ते म्हणाले.

या अधिकाऱ्यांनी अकादमीचा निरोप घेताना आपल्या आकांक्षा आणि योजना रेकॉर्ड करून ठेवाव्यात आणि कामगिरीचे मूल्य मापन करण्यासाठी 25-30 वर्षांनी त्याचा आढावा घ्यावा असे त्यांनी सुचवले. अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित अभ्याक्रम आणि संसाधनाचा समावेश असावा कारण भविष्यातल्या समस्यात डाटा विज्ञान हा मोठा घटक असेल.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीचा 96 वा  कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रम हा मिशन कर्मयोगी तत्वावर आधारित पहिला कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रम आहे. नवे अध्यापन आणि अभ्यासक्रम आराखडाही यामध्ये आहे. या तुकडीत 16 सेवा आणि प्रशासन, पोलिस आणि वन या तीन रॉयल भूतान सेवांमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी (OT) असे एकूण 488 जण समाविष्ट आहेत.

युवा तुकडीच्या साहसी आणि कल्पक वृत्तीची जोपासना करण्यासाठी मिशन कर्मयोगी तत्वावर आधारित नव्या  अध्यापन शास्त्राची आखणी करण्यात आली. सबका प्रयास या भावनेने पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींशी संवाद, ग्रामीण भागाचा अनुभव घेण्यासाठी गावांना भेटी यासारख्या उपक्रमातून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे, विद्यार्थ्यातून नागरिक आणि सार्वजनिक सेवक या भूमिकेत परिवर्तन व्हावे यावर भर देण्यात आला आहे. दुर्गम/सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी अशा गावांना भेटी दिल्या. स्व शिक्षण आणि सातत्याने श्रेणीबद्ध शिक्षणाच्या दृष्टिकोनाचा अवलंब करण्यात आला आहे. परीक्षेच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी या  भूमिकेत परिवर्तन करत आरोग्यसंपन्न युवा प्रशासकीय सेवक घडण्याच्या दृष्टीकोनातून आरोग्य चाचण्यांबरोबरच फिटनेस चाचण्याही करण्यात आल्या. सर्व 488 अधिकाऱ्यांना क्रावा मागा आणि अन्य अनेक खेळांचेही प्राथमिक स्तरावर प्रशिक्षण दिले गेले.

 

 

 

 

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806974)