माहिती आणि प्रसारण मंत्रालय
17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका दाखल करण्याच्या मुदतीत वाढ
चित्रपटनिर्मात्यांना 20 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील, 1 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट असतील पात्र
29 मे ते 4 जून 2022 दरम्यान होणार मिफचे आयोजन
इंडिया@75 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटासाठी विशेष पुरस्कार
सर्वोत्तम माहितीपटाला मिळणार सुवर्णशंख आणि 10 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार
Posted On:
15 MAR 2022 9:06PM by PIB Mumbai
मुंबई, 15 मार्च 2022
17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी( मिफ 2022) प्रवेशिका दाखल करण्याची मुदत 20 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांना आता माहितीपट, शॉर्ट फिक्शन आणि ऍनिमेशन श्रेणीतील फिल्म्ससाठी 20 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका पाठवता येतील. मिफ-2022 मध्ये प्रवेशासाठी 1 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान तयार झालेल्या फिल्म्स पात्र असतील.
29 मे ते 4 जून 2022 दरम्यान 17व्या मिफचे आयोजन मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात करण्यात येणार आहे. अधिक तपशीलासाठी चित्रपट निर्माते www.miff.in किंवा https://filmfreeway.com/MumbaiInternationalFilmFestival-MIFF येथे लॉग इन करू शकतात आणि विविध स्पर्धांच्या श्रेणींसाठी त्यांच्या फिल्म्स दाखल करू शकतात. चौकशीसाठी महोत्सव संचालनालयाशी +91-22-23522252 / 23533275 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा miffindia[at]gmail[dot]com या ई-मेलवर संपर्क करता येईल.
या महोत्सवात सर्वोत्तम माहितीपटाला सुवर्णशंख आणि 10 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार देण्यात येईल. विविध श्रेणीतील विजेत्या फिल्म्सना भरघोस रोख रकमांचे पुरस्कार, रौप्य शंख, ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात येतील.
सध्या भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असल्याने यंदाच्या महोत्सवात इंडिया@75 या संकल्पनेवर आधारित सर्वोत्तम लघुपटाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
या महोत्सवात भारतीय नॉन फीचर फिल्म समुदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा देखील व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्याला 10 लाख रुपये रोख, ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. मिफ महोत्सव हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित होणारा नॉन फीचर फिल्म्सचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा महोत्सव आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र सरकारचे पाठबळ मिळत असून जगभरातील अनेक चित्रपट निर्माते याला पर्वणी मानतात.
स्पर्धा आणि बिगर स्पर्धात्मक श्रेणींव्यतिरिक्त कार्यशाळा, मास्टर क्लासेस, खुले मंच आणि बिझनेस टू बिझनेस सत्रे यांसारखी परस्पर संवादात्मक सत्रांचे आयोजन ही या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
16व्या मिफमध्ये भारतातून आणि परदेशातून विक्रमी 871 प्रवेशिका आल्या होत्या आणि भारतातील आणि जगाच्या इतर भागातील प्रमुख माहितीपट, ऍनिमेशनपट आणि लघुपट निर्माते या महोत्सवात सहभागी झाले होते. या महोत्सवाच्या मान्यवर परीक्षकांमध्ये फ्रान्स,जपान, सिंगापूर, कॅनडा, बल्गेरिया आणि भारतातील चित्रपट क्षेत्रातील नामवंतांचा समावेश होता.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806370)
Visitor Counter : 293