संरक्षण मंत्रालय

जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संस्थेत अध्यासन केंद्राची सुरुवात

Posted On: 15 MAR 2022 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2022

 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपीन रावत यांच्या 65 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या संस्थेत रावत यांच्या स्मरणार्थ अध्यासन केंद्र सुरु केले.

नवी दिल्ली येथील साउथ ब्लॉक येथे आज झालेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुख आणि सीओएससीचे कार्यकारी अध्यक्ष जनरल एमएम नरवणे यांनी यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, हवाई दल उपप्रमुख एअरमार्शल संदीप सिंग, नौदल उपप्रमुख व्हॉईस अॅडमिरल एसएन घोरमडे सीआयएससी प्रमुख आणि एकात्मिक संरक्षण दल प्रमुख एअर मार्शल बी आर कृष्णा आणि डीसीओएएस (स्ट्रॅट) लेफ्टनंट जनरल एस के शर्मा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संस्थेचे संचालक मेजर जनरल बी.के. शर्मा (निवृत्त) यांच्याकडे 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला. ही रक्कम अध्यासनाद्वारे नामनिर्देशित उमेदवाराला देण्यात येईल.

भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स) म्हणून तसेच 27 वे लष्करप्रमुख म्हणून अतुलनीय कामगिरीचे प्रदर्शन करणारे दिवंगत जनरल बिपीन रावत भारतीय लष्कराच्या अत्यंत महत्त्वाच्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होते. जनरल बिपीन रावत स्मृतीप्रीत्यर्थ सुरु होत असलेले हे अध्यासन संयुक्तता आणि एकात्मता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. हे अध्यासन म्हणजे जनरल रावत यांच्या कुशल नेतृत्वगुण आणि व्यावसायिकतेला वाहिलेली श्रद्धांजली आहे.

धोरणात्मक विचारांबाबत जनरल रावत यांचे विचार किती उत्कट होते आणि सैन्याच्या विविध  थिंक टँकच्या कार्यात त्यांनी किती मोठ्या प्रमाणावर वेळ आणि उर्जा खर्च केली याची आठवण काढून आजच्या कार्यक्रमात लष्करप्रमुखांनी सांगितले की, रावत यांच्या 65 व्या जयंतीने सैन्याला त्यांच्या बौद्धिक संपदा विषयक संस्थांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची संधी दिली आहे. हे अध्यासन तिन्ही सेनादलांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात प्राविण्य असणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी खुले आहे.   


* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806138) Visitor Counter : 356