उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी प्रतिसादात्मक प्रशासनासाठी पुराव्यावर आधारित धोरण रचनेचे महत्त्व केले अधोरेखित

Posted On: 14 MAR 2022 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 14 मार्च 2022

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आपल्या आजूबाजूला होत असलेले बदल आणि विचलित करणाऱ्या घटनांबाबत प्रशासन प्रतिक्रियाशील असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आज पुराव्यावर आधारित धोरण रचनेच्या महत्त्वावर भर दिला. नव्याने उदयास येत असलेल्या गरजा आणि आवश्यकतांनुसार सरकारी धोरणे  आणि कार्यक्रम यांच्याविषयी सतत पुनर्विचार तसेच फेरबदल करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.  

उप-राष्ट्रपती निवासात आज झालेल्या आयएसबी अर्थात इंडियन स्कूल ऑफ बँकिंगच्या ‘सरकारी धोरणांबाबतच्या आधुनिक व्यवस्थापन कार्यक्रमा’तील सहभागींशी संवाद साधताना उपराष्ट्रपतींनी शेतकऱ्यांना तसेच सामान्य माणसाला मदत करण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन आणि पिकाच्या फोफाट्यातून उत्पन्न यांसारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित व्यापार मॉडेल विकसित करण्याचे आवाहन केले.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांनी व्यक्त केलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या उच्च विकासदराच्या अंदाजाचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी उद्योजक तसेच गुंतवणूकदारांसाठी देशात प्रचंड क्षमता आणि संधी आहेत ही बाब अधोरेखित केली. ते म्हणाले, “अपेक्षित बदल घडवू आणण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रितपणे काम करणे आणि अधिक उत्तम तसेच सशक्त भारताची उभारणी करणे महत्त्वाचे आहे.”  

शहरी आणि ग्रामीण भागादरम्यानची दरी दूर करण्याचे आवाहन करून ते म्हणाले की ग्रामीण भागातील जनतेमध्ये  देशाच्या विकासात्मक प्रवासाचा भाग असल्याची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.

कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना यांच्या पिकाचा योग्य मोबदला मिळेल आणि त्यांचे घरटी उत्पन्न चांगल्या पातळीपर्यंत वाढेल याची खात्री करून घेण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या दृष्टीने हवामानाशी सुसंगत सेंद्रिय शेती प्रणालीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात, सेंद्रिय शेतीकडे वळल्यामुळे सिक्कीममधील शेतकऱ्यांना मिळालेल्या यशाचे उदाहरण त्यांनी दिले.

सरकारी धोरणाच्या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आयएसबीचे कौतुक केले. सरकारी धोरणांबाबतचा आधुनिक व्यवस्थापन कार्यक्रम’ या विषयावर आधारित हा अभ्यासक्रम सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिकांच्या व्यवस्थापकीय कौशल्याला अधिक तेज करेल. कारकीर्दीच्या मधल्या टप्प्यावरच्या खासगी आणि सरकारी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची ही मिश्र तुकडी त्यांना एकमेकांकडून नव्या बाबी शिकण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805968) Visitor Counter : 142