पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते एमओपीएनजी स्वच्छता पंधरवडा पारितोषिकांचे वितरण तसेच ‘भारतीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संबंधीची आकडेवारी 2020-21’चे प्रकाशन

Posted On: 11 MAR 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2022

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने साजरा केलेल्या स्वच्छता पंधरवड्यातील विविध कार्यक्रमांच्या विजेत्यांना आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रालयातर्फे दर वर्षी जारी करण्यात येणाऱ्या ‘भारतीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संबंधीची आकडेवारी 2020-21’ चे प्रकाशन देखील केले. हा अहवाल म्हणजे कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचे खनन, उत्पादन, शुद्धीकरण, वाहतूक आणि विपणन तसेच आयात आणि निर्यात यांसह भारताच्या तेल आणि वायू क्षेत्राचे एकंदर चित्र स्पष्ट करणारे माहितीचे भांडार आहे.

स्वच्छता पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रमातील विजेते आणि इतर सहभागी यांचे अभिनंदन करून केंद्रीय मंत्री म्हणाले की, सर्व केंद्रीय कार्यक्रमांमध्ये  स्वच्छता हा विषय एखाद्या योजनेपेक्षा मोठा आहे. यामध्ये प्रत्यक्ष उद्दिष्ट्टे आहेतच पण त्याचबरोबर सर्वांमध्ये स्वच्छतेबाबत अधिकाधिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु असलेली एक प्रक्रिया देखील आहे. ते म्हणाले की तेल आणि वायू क्षेत्रातील भागधारकांनी  त्यांच्या कार्यात हे तत्वज्ञान अंगिकारले आहे आणि त्यांच्या कार्यस्थळाचे परिसर आता अत्यंत उत्तम दर्जाचे झाले आहेत. हे क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये देत योगदानाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची प्रशंसा केली.

तेल आणि वायू क्षेत्रातील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संलग्न कार्यालयांनी गेल्या वर्षी 1 ते 15 जुलै या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते. स्वच्छ भारत अभियानात तसेच अधिक स्वच्छ, हरित आणि निरोगी देशाची निर्मिती करण्यात  योगदान देण्यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील समुदायांनी त्यांचा सक्रीय सहभाग नोंदवावा याकरिता त्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी  या पंधरवड्यात मोठी उत्सुकता आणि उत्साहासह अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. निरोगी स्पर्धा आणि या कार्यक्रमांच्या अधिक प्रभावी परिणाम यांच्या सुनिश्चितीसाठी  स्वच्छता पंधरवडा पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ही पारितोषिके दिली जाणार होती. या पंधरवड्यातील कामगिरीनुसार आयओसीएलने प्रथम, ओएनजीसीने दुसरे तर एचपीसीएलने तिसरे पारितोषिक मिळविले.

 केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमात 2 लाखांहून अधिक स्वच्छता किट्स, सुमारे 3 लाख मास्क आणि 1.1 लाख पर्यावरणस्नेही पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सुमारे 1.3 लाख झाडे लावण्यात आली आणि 7 हजारांहून अधिक कचऱ्याचे डबे योग्य ठिकाणी बसविण्यात आले. या पंधरावड्यामध्ये प्लॅस्टिक कचरा संकलन करणारी 40 केंद्रे उभारण्यात आली आणि ऑनलाईन पद्धतीने 4 हजारांहून अधिक अंतर्गत आणि बाह्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सुमारे 70 हजार लोकांनी भाग घेतला.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805114) Visitor Counter : 216