युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक सहाय्य करण्याच्या निकषांमध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून 1 मार्च 2022 पासून सुधारणा


देशातील क्रीडा क्षेत्रात जलद प्रगती होण्यासाठी उपक्रमांच्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यासाठी आता अवलंबला सर्वसमावेशक दृष्टिकोन: अनुराग ठाकूर

Posted On: 09 MAR 2022 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2022

केंद्र सरकार त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघ सहाय्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा महासंघाना (NSFs) भारतीय खेळाडू आणि संघांचे प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग यासह विविध क्रीडा उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य देत आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 1 मार्च 2022 पासून सहाय्याच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, या  संदर्भातले निकष हे नोव्हेंबर 2015 पासून लागू होते  त्यामुळे आमच्या खेळाडूंच्या विकासासाठी आणि यशासाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांसाठी ते पुरेसे नाहीत हे लक्षात घेऊन त्यात सुधारणा करण्यात आली आहे. देशातील क्रीडा क्षेत्रात जलद प्रगती करण्यासाठी उपक्रमांच्या महत्त्वाच्या पैलूंचा समावेश करण्यासाठी आता सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला गेला आहे, असेही त्यांनी नमूद केले. दिव्यांग खेळाडूंना पाठबळ, देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, भारतीय प्रशिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण मिळावे याची खात्री करणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

सुधारित नियमांनुसार, उच्च प्राधान्य, प्राधान्य  आणि भारतीय पारंपरिक खेळांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठीचे सहाय्य  51 लाख रुपयांपर्यंत तर सामान्य श्रेणीतील खेळांसाठी जे पूर्वी 'इतर' म्हणून ओळखले जात त्यांच्यासाठी सहाय्य रक्कम 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिव्यांग खेळाडूंशी संबंधित  राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी सर्व श्रेणीतील प्रत्येक प्रकारासाठी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी 15 लाख रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे.

जनरल स्पोर्ट्स ट्रेनिंग किट (जसे की ट्रॅक सूट, टी-शर्ट, शॉर्ट्स, वॉर्म अप शूज इ.) साठी राष्ट्रीय शिबिरार्थींना वर्षातून एकदा प्रति खेळाडू दिला जाणारा भत्ता दुप्पट करून 20,000 रुपये करण्यात आला आहे.

देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघाला प्रोत्साहन म्हणून सहाय्याची रक्कम 30 लाख रुपयांवरून वाढवून 1  कोटी रुपये करण्यात आली आहे.

व्यवस्थापकांना आता परदेशातील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी भारतीय दलाचा एक भाग मानले जाईल.

क्रीडा विषयक डॉक्टर आणि डॉक्टरांचे मानधन पूर्वीच्या प्रति महिना 1 लाख रुपयांवरून वाढवून 2 लाख रुपये करण्यात आले आहे.

परदेशी प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसाठी, राष्ट्रीय क्रीडा महासंघाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी सल्लामसलत करून स्वतःहून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परदेशी प्रशिक्षकांसाठी निधी हा  राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या एकूण मंजूर आर्थिक निधीच्या 30% पर्यंत मर्यादित राहील.

राष्ट्रीय क्रीडा महासंघाला प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता या तत्त्वाचे पालन करण्यास सांगितले गेले आहे आणि जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी भारतात उपलब्ध असलेल्या प्रतिभांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यास सांगितले आहे आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाने हे सुनिश्चित केले पाहिजे कि प्रशिक्षणादरम्यान किमान 5 भारतीय प्रशिक्षक परदेशी प्रशिक्षकांसोबत राहतील जेणेकरून भारतीय प्रशिक्षक देखील अधिक उत्तम सज्ज  होतील आणि परदेशी प्रशिक्षकांवरील अवलंबित्व कमी होईल.

मुख्य प्रशिक्षक आणि इतर प्रशिक्षकांचे मानधन अनुक्रमे प्रति महिना 1.5 लाख रुपये आणि 75000 रुपयांवरून सुधारित करून 3 लाख रुपये आणि 2 लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे.

 

  

N.chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804516) Visitor Counter : 229