माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीडी इंडिया ‘यप्प टीव्ही’ च्या माध्यमातून वैश्विक ओटीटी मंचावर

Posted On: 07 MAR 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2022

 

डीडी इंडिया वाहिनीचा वैश्विक विस्तार करण्यासाठी तसेच विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताचा दृष्टिकोन जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रसार भारतीने डीडी इंडियाचे प्रसारण ‘यप्प टीव्ही’ (Yupp TV) या  ओटीटी म्हणजेच ओव्हर-द -टॉप या मंचाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरातल्या दूरदर्शनच्या प्रेक्षकांना यप्प टीव्हीच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम पहायला मिळू शकणार आहेत. भारताची संस्कृती आणि मूल्यांविषयी माहिती संपूर्ण जगाला व्हावी, यासाठी देशातली सार्वजनिक प्रसारक संस्था - प्रसार भारती आणि  यप्प टीव्ही यांच्यामध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 

या सामंजस्य करारामुळे डीडी इंडियाचे कार्यक्रम आता अमेरिका, यूके, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये ‘यप्प टीव्ही’ या ओटीटी मंचावरून उपलब्ध होवू शकणार आहेत.

डीडी इंडिया ही प्रसार भारतीची  आंतरराष्ट्रीय वाहिनी असून ती जगासाठी भारताची खिडकी आहे. या वाहिनीव्दारे आपल्या विविध कार्यक्रमांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींविषयी भारताचा दृष्टीकोन मांडत असते. 190 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध असलेली डीडी इंडिया वाहिनी ही जगभरामध्ये असलेल्या भारतीयांसाठी एक सेतू म्हणून कार्यरत आहे.

डीडी इंडिया वाहिनीवरून प्रसारित होणारे विश्लेषणात्मक कार्यक्रम, केले जाणारे भाष्य, मांडलेली विचार प्रवर्तक मते, अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून दाखवण्यात येणारी दृश्ये यामुळे जागतिक समस्यांवर भारत प्रभावशाली कार्य करू शकतो, हे स्थापित झाले आहे. सखोल विश्लेषण आणि संशोधनावर आधारित लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे - ‘बायो -क्वेस्ट’ ही मालिका आहे. यामध्ये कोविड-19 ची उत्पत्ती, लसीचा केलेला विकास आणि कोविडसंबंधी इतर वैज्ञानिक शोधांची माहिती देणारी ही मालिका आहे. इंडिया आयडियाज, वर्ल्ड टुडे, इंडियन डिप्लोमसी, डीडी डायलॉग, न्यूज नाइट या कार्यक्रमांना खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

यप्प टीव्हीच्या माध्यमातून आता कोणीही जगामध्ये कुठूनही थेट डीडी इंडिया वाहिनी पाहू शकणार आहे. यप्प टीव्हीने भारतीय टीव्ही वाहिनी सहजतेने आणि किफायतशीरपणे जगभरामध्ये उपलब्ध करून दिली आहे.

डीडी इंडियाच्या कार्यक्रमांच्या प्रसारणाविषयीच्या करारावर प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती आणि यप्प टीव्हीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी यांनी स्वाक्षरी केल्या. 


* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803556) Visitor Counter : 257