नौवहन मंत्रालय
‘इंडो - बांगलादेश प्रोटोकॉल मार्गाने’ ब्रह्मपुत्रा आणि गंगा यांची जोडणी; पाटणा गोदीतून अन्नधान्य घेऊन पांडू येथे मालवाहू जहाजाचे आगमन
पहिल्यांदाच चार मालवाहू जहाजांव्दारे अन्नधान्य, ‘टीएमटी बार’ची वाहतूक
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2022 8:03PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज गुवाहाटी येथे पाटणा ते पांडू अशी बांगलादेशमार्गे अन्नधान्याची वाहतूक करणा-या पहिल्या मालवाहू जहाजाचे स्वागत केले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वसर्मा, आणि गुवाहाटीच्या लोकसभेतील खासदार क्विन ओझा यांच्यासह अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी एमव्ही लाल बहादूर शास्त्री या स्व-चलित जहाजाचे स्वागत केले. या मालवाहू जहाजातून भारतीय अन्न महामंडळासाठी 200 मेट्रिक टन अन्नधान्याची बांगलादेशमार्गे पाटणा ते पांडू पहिल्यांदाच वाहतूक करण्यात आली. आसाम आणि ईशान्य भारतासाठी अंतर्देशीय जलवाहतुकीचे नवीन युग सुरू झाल्याची घोषणा यावेळी अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून (आयडब्ल्यूएआयकडून) करण्यात आली. त्यानुसार एनडब्ल्यू1 आणि एनडब्ल्यू 2 यांच्या दरम्यान एक वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार जलमार्गाने मालवाहतूक करण्याची आयडब्ल्यूएआयची योजना आहे.

बांगलादेशमार्गे ऐतिहासिक व्यापारी मार्गाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना पीएमगतीशक्ती अंतर्गत वेग आला आहे. यामुळे आता ईशान्येकडील राज्यांच्यादृष्टीने एक संपर्क केंद्र म्हणून हा भाग विकसित होवू शकणार आहे. एकात्मिक विकास आराखडा, पीएम गती शक्ती अंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीमधून मालवाहतूक वेगाने व्हावी, यासाठी कार्य करण्यात आले आहे.
यामध्ये आणखी एक मालवाहू जहाज एमव्ही राम प्रसाद बिसमिल तसेच कल्पना चावला आणि एपीजे अब्दुल कलाम या सर्वसुविधायुक्त दोन्ही नौकांनी दि. 17 फेब्रुवारी, 2022 रोजी हल्दिया येथून प्रवासाला प्रारंभ केला आहे. त्यामधून 1800 मेट्रिक टन टाटा स्टील वाहून आणण्यात येत असून ही मालवाहू जहाजे पांडू येथे पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. ही मालवाहू जहाजे बांगलादेशाच्या सीमेवर धुब्री येथे याआधीच पोहोचली आहेत. तसेच नुमालीगड बायो-रिफायनरीचा ओडीसी (ओव्हर डायमेंशनल कार्गो, 252 मेट्रिक टन) दि. 15 फेब्रुवारी रोजी हल्दिया येथून आयडब्ल्यूटी मार्गे आयबीपी मार्गे सिलघाट येथे पोहोचला आहे. तसेच आणखी एक ओडीसी- 250 मेट्रिक टन माल घेवून येणारे जहाज सिलघाटच्या मार्गावर आहे.

आयडब्ल्यूएआयच्यावतीने या मार्गांवर निश्चित वेळापत्रक तयार करून नियमित मालवाहू सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1803389)
आगंतुक पटल : 439