पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान, क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत सहभागी

Posted On: 03 MAR 2022 10:55PM by PIB Mumbai

पंतप्रधानांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत भाग घेतला.

या बैठकीत, सप्टेंबर 2021 च्या क्वाड परिषदे नंतरच्या  क्वाड उपक्रमांच्या  प्रगतीचा आढावा घेण्यात आला.  या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेद्वारे ठोस परिणाम साध्य करण्याच्या उद्देशाने नेत्यांनी सहकार्याला गती देण्यावर सहमती दर्शवली.

हिंद-प्रशांत प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्दिष्टावर क्वाडने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  मानवतावादी आणि आपत्ती मदत , कर्ज शाश्वतता, पुरवठा साखळी, स्वच्छ ऊर्जा, संपर्क व्यवस्था आणि क्षमता-बांधणी यासारख्या क्षेत्रात क्वाड संघटनेच्या देशांमध्ये ठोस आणि व्यावहारिक सहकार्य असावे असे त्यांनी आवाहन केले.

युक्रेनमधील घडामोडींवर बैठकीत मानवतावादी परिप्रेक्ष्यातून चर्चा करण्यात आली.  संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.

नेत्यांनी, आग्नेय आशिया, हिंद महासागर प्रदेश आणि पॅसिफिक बेटांच्या परिस्थितीसह इतर विषयांवरही चर्चा केली.  पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र सनद , आंतरराष्ट्रीय कायदा आणि सार्वभौमत्व तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.

जपानमधे होणाऱ्या आगामी शिखर परिषदेसाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांवर काम करण्याबाबत  आणि परस्परांच्या संपर्कात राहाण्यावर नेत्यांनी सहमती दर्शवली.

***

JPSVG

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802841) Visitor Counter : 210