आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - 5 च्या पश्चिम क्षेत्र प्रसार कार्यशाळेला संबोधित केले
"केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन सारख्या कार्यक्रमांच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या डब्ल्यूएएसएच (WASH) निर्देशांकात लक्षणीय सुधारणा झाली आहे"
Posted On:
03 MAR 2022 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली येथे पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या पश्चिम क्षेत्र प्रसार कार्यशाळेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार मानून आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि या क्षेत्रातील उदयोन्मुख समस्यांबद्दल उच्च दर्जाचा डेटा प्रदान केल्याबद्दल एनएफएचएस NFHS ची प्रशंसा करून आपले भाषण सुरू केले.
लोकसंख्या, कुटुंब नियोजन, बाल आणि माता आरोग्य, पोषण, प्रौढ आरोग्य, आणि घरगुती हिंसाचार, यासह इतर प्रमुख निर्देशांकाबाबत एनएफएचएस अंदाज वर्तवते. जे आरोग्य आणि कल्याण धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सर्वेक्षणाची व्याप्ती गेल्या काही वर्षांत विस्तारली आहे आणि उदयोन्मुख लोकसंख्या आणि आरोग्य समस्यांव्यतिरिक्त, मधुमेह, उच्च रक्तदाब, पंडुरोग, HbA1c, D3 आणि मलेरियारोधक पॅरासाईट्ससाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - 5 मध्ये अनेक बायोमार्कर समाविष्ट केले आहेत.
यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, “गेल्या काही वर्षांपासून, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या विविध फेऱ्यांच्या निष्कर्षांचा वापर पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि धोरण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे". त्या पुढे म्हणाल्या की, “एनएफएचएस-5 चे निष्कर्ष निकष निश्चितीसाठी आणि आरोग्य क्षेत्रात कालांतराने झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. विद्यमान कार्यक्रमांच्या परिणामकारकतेचा पुरावा देण्याबरोबरच, NFHS-5 मधील डेटा क्षेत्र निहाय भर देण्याबरोबरच नवीन कार्यक्रमांची गरज ओळखण्यात आणि अत्यावश्यक सेवांची सर्वाधिक गरज असलेल्या गटांना ओळखण्यात मदत करतो.”
एनएफएचएस -5 चे निष्कर्ष एका महत्वपूर्ण टप्प्यावर प्रसिद्ध केले आहेत, जे 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) पूर्ण करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पावले उचलण्यास उपयुक्त ठरतील, असे त्यांनी अधोरेखित केले. 27 शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशकांसाठी NFHS-5 डेटा स्रोत पुरवेल.
डॉ पवार यांनी माहिती दिली की काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये माता आणि बाल आरोग्य निर्देशकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालयांमधील प्रसूतीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि सी-सेक्शन जन्मदरातही वाढ झाली आहे. मात्र त्यांनी नमूद केले की महिलांमध्ये ऍनिमिया हे अद्याप एक आव्हान आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणखी बरेच विचार मंथन करणे आवश्यक आहे.
त्यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली, स्वच्छ भारत मिशन सारख्या केंद्र सरकारच्या विविध कार्यक्रमांच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी पाणी, साफसफाई आणि स्वच्छता (वॉश) निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. बाल आरोग्य आणि महिला सक्षमीकरण निर्देशक उदा. घर किंवा जमिनीची मालकी, मोबाईल फोनचा वापर यात सुधारणा झाली आहे, मात्र त्याच वेळी महिलांवर हिंसाचार अजूनही सुरूच आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातही बरेच काही करायचे आहे असे त्यांनी नमूद केले.
डॉ भारती प्रवीण पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे भारतातील आरोग्यसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आणि त्यांना सरकारला केवळ अर्थपूर्ण धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यास मदत करण्यासाठीच नव्हे तर त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी काम करण्याचे आणि पंतप्रधानांच्या कल्पनेतील सर्वांसाठी दर्जेदार आरोग्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी सहाय्यक भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802667)
Visitor Counter : 254