उपराष्ट्रपती कार्यालय

युवकांनी यश मिळवण्यासाठी जिद्दीने कठोर प्रयत्न करावेत- उपराष्ट्रपतींचा सल्ला


खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

तरुणांनी योग्य मूल्ये आत्मसात करावीत आणि इतरांबद्दल सहानुभूती विकसित करावी- उपराष्ट्रपती

विजयवाड्यातील स्वर्ण भारत ट्रस्ट इथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणार्थींशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद

Posted On: 03 MAR 2022 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मार्च 2022

 

युवकांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्यासाठी दृढनिश्चयाने प्रयत्न करण्याचा आणि स्पर्धेला सामोरे जात यश मिळवण्याचा सल्ला उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी आज दिला.

विजयवाड्यातील स्वर्ण भारत ट्रस्ट, इथल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणार्थींना त्यांनी मार्गदर्शन केले. “मोठी स्वप्ने पाहा आणि ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करा” असे ते म्हणाले. 

एकटे सरकार तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आणि त्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी किंवा रोजगार शोधण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करून सक्षम करण्याचे आवाहन केले.

राष्ट्र उभारणीसाठी तरुणांच्या उर्जेला दिशा देणे महत्त्वाचे असल्याचे निरीक्षण नोंदवत ते म्हणाले की, युवकांना कौशल्य आणि सक्षम बनवण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भर देत आहेत. ‘कुशल भारता’चे ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणार्थींनी थोर पुरुष आणि महिलांच्या जीवनविषयक साहित्याचे वाचन करून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला. त्याच वेळी, तरुणांनी योग्य मूल्ये आत्मसात केली पाहिजे आणि इतरांबद्दल आपुलकी विकसित केली पाहिजे. आपल्याजवळचे वाटून घेणे आणि काळजी घेणे (‘शेअर अँड केअर’) ही वृत्ती भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असे ते म्हणाले.

भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्याच्या गरजेवर भर देत नायडू यांनी तरुणांना त्यांच्या मुळांकडे परत जाण्याचा सल्ला दिला. जंक फूड टाळावे आणि सकस आहार घ्यावा असे सुचवून ते म्हणाले की निरोगी जीवनशैली राखण्यासाठी योगासनांसारखा नियमित शारीरिक व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

यावेळी स्वर्ण भारत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.कामिनेनी श्रीनिवास आदी उपस्थित होते.

 

* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802622) Visitor Counter : 185