महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचा 17 वा स्थापना दिन साजरा
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी आयोगाच्या ‘भविष्यो रक्षति रक्षित: या नव्या ध्येयवाक्याचे केले अनावरण
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2022 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2022
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा 17 वा स्थापना दिन आज नवी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात 15 ऑगस्ट मैदानावर साजरा करण्यात आला. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कान्गो, महिला आणि बालविकास सचिव इंदीवर पांडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आयोगाच्या ‘भविष्यो रक्षति रक्षित: या नव्या ध्येयवाक्याचे अनावरण केले. त्या म्हणाल्या , “हे नवीन ध्येयवाक्य आपल्याला आपले भविष्य म्हणजेच देशातील लहान मुलांचे संरक्षण करण्याचा उपदेश करते कारण या मुलांच्या कल्याणातूनच मजबूत देशाचा पाया घातला जाणार आहे.”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी विविध राज्यांतील मुलांशी संवाद साधला तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या बालपणात केलेल्या कार्याविषयीच्या कथांवर आधारित प्रदर्शनाला देखील भेट दिली आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण केले. सीमा सुरक्षा दलाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या संयुक्त सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे सुरु केलेल्या ‘सहारा’ या उपक्रमाचे देखील केंद्रीय मंत्री इराणी यांनी कौतुक केले. सीमा सुरक्षा दलातील सर्वोच्च समर्पण करणाऱ्या जवानांच्या मुलांना मनो-सामाजिक समुपदेशन आणि मदत पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या दोन संस्थांनी एकत्र येऊन असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट संदेशात सांगितले की, दोन महिन्यांत अशा प्रकारच्या 300 कॉल्सना योग्य उत्तरे देण्यात आली आहेत आणि वेबलिंकच्या माध्यमातून 127 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1802135)
आगंतुक पटल : 1468