विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तरुण प्रतिभावंतांना मार्गदर्शन करणे ही भारतासाठी @2047 च्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक आहे - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह
आपल्या वैज्ञानिक कामगिरीचे मर्म आणि भव्यता साजरी करण्यासाठी "विज्ञान सर्वत्र पूज्यते" या देशव्यापी कार्यक्रमात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाच्या समारोप समारंभाला डॉ. जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विज्ञान संवाद पुरस्कार प्रदान
Posted On:
28 FEB 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2022
तरुण प्रतिभावंतांना मार्गदर्शन करणे ही भारतासाठी @2047 च्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक आहे, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. पुढची 25 वर्षे कार्यरत असणाऱ्या तरुण वैज्ञानिकांना पुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्यासाठी आखण्यात येत असलेल्या रुपरेषेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. आपली वैज्ञानिक कामगिरी आणि तिची भव्यता साजरी करण्यासाठी देशभरात आयोजित “विज्ञान सर्वत्र पूज्यते” या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाच्या समारोप समारंभाला डॉ जितेंद्र सिंह संबोधित करत होते.
"विज्ञान सर्वत्र पूज्यते" या एक आठवडा चाललेल्या स्मृती उत्सवामागची भावना, “विज्ञानाचा आनंद घेणे आणि त्याची पूजा करणे” ही आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आणि आपल्याकडे जे नव्हते ते आपण कसे भरून काढतो याचे अवलोकन करण्याची संधी यातून मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. विज्ञान आणि वैज्ञानिक विचार सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे देखील ध्येय आहे. वैज्ञानिक माहिती आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा अवलंब करून तो लाभ मिळवू शकतो आणि त्यामुळे सखोल वैज्ञानिक विचार विकसित होऊ शकतात ,असेही ते म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांना दिलेल्या शुभेच्छांचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी म्हटले आहे, "सर्व वैज्ञानिक आणि विज्ञानप्रेमींना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. मानवी प्रगतीसाठी आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि विज्ञानाच्या सामर्थ्याचा लाभ उठवण्यासाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ करूया."
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, "विज्ञान सर्वत्र पूज्यते" (विज्ञानाप्रति सार्वत्रिक आदर), हा देशव्यापी कार्यक्रम 22 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्लीसह 75 ठिकाणी सुरू केला होता, त्याला व्यापक प्रतिसाद आणि प्रशंसा मिळाली आहे. आज राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाचा समारोप होत असताना, आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनी हा उपक्रम संघर्ष आणि त्यागामुळे भारतात झालेला आधुनिक विज्ञानाचा उदय प्रतिबिंबित करतो तसेच 2047 च्या स्वप्नाकडे नेणाऱ्या पुढील 25 वर्षांसाठी रूपरेषा निश्चित करतो. हा कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करणार्या "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव" चा एक भाग होता. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षांच्या कामगिरीला अभिवादन करण्याचा आणि ती प्रदर्शित करण्याचे हे एक निमित्त आहे.
आपण भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना , स्वातंत्र्य सैनिकांबरोबरच महेंद्रलाल सरकार, जेसी बोस आणि पीसी रे यांच्यासारख्या भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाचे स्मरण देखील करायचे आहे , ज्यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया रचण्यासाठी संघर्ष केला, असे त्यांनी सांगितले. भारत हा त्या मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या संविधानात विज्ञानाचा विशेष उल्लेख केला आहे. ते म्हणाले, वैज्ञानिक वृत्ती, मानवतावाद आणि चौकसपणा आणि क्रांतीची भावना जोपासणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे.
सर सी.व्ही. रमण यांच्या 1930 मधील नोबेल पारितोषिक विजेत्या ‘रमण इफेक्ट’ शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ जितेंद्र सिंह यांनी विज्ञान संवाद पुरस्कार प्रदान केले. हे पुरस्कार दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनी प्रदान केले जातात. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे .
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801876)
Visitor Counter : 257