राष्ट्रपती कार्यालय
तेजपूर विद्यापीठ समुदायाने स्थानिक आणि राष्ट्रीय समस्यांबाबत नाविन्यपूर्ण उपाययोजना द्याव्या : राष्ट्रपती कोविंद
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत तेजपूर विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ
Posted On:
26 FEB 2022 3:27PM by PIB Mumbai
तेजपूर विद्यापीठ समुदायाने स्थानिक आणि राष्ट्रीय समस्यांबाबत अधिक नाविन्यपूर्ण उपाययोजना द्याव्यात असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या आज 26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या 19 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी समाजाला सहभागी करून घेऊन स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. आसाममधील अनेक गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी तेजपूर विद्यापीठाने केलेल्या अभिनव उपाययोजनांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाले की आसाम राज्याला अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध जैवविविधतेची देणगी मिळालेली आहे. आसामच्या प्रत्येक रहिवाशाने विशेषतः तरुणांनी या देणगीचे जतन करणे आणि शाश्वत विकास साधणे या आघाड्यांवर अत्यंत सक्रीय असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तेजपूर विद्यापीठाने योजलेल्या विशेषतः त्यांनी येथील गावांमध्ये राबविलेल्या नूतनीकरणीय उर्जा विषयक उपक्रमांची नोंद घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, आसाम राज्याने जैवविविधतेच्या संवर्धनासंदर्भात कौतुकास्पद कार्य केले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प तसेच हत्ती संरक्षण प्रकल्प ही अशा संवर्धनाची अत्यंत प्रभावशाली उदाहरणे आहेत.
ईशान्य प्रदेशातील राज्ये सेंद्रिय शेतीला मोठे प्राधान्य देत आहेत याचा निर्देश करत राष्ट्रपती म्हणाले की, या भागातील कृषी उत्पादनांच्या ब्रँडींग आणि विपणनामध्ये तेजपूर विद्यापीठ महत्त्वाची भूमिका निभावू शकेल.
कोविड महामारीमुळे शिक्षणविषयक कार्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, आपल्या देशातील काहीश्या वंचित राहिलेल्या वर्गाच्या शिक्षणावर या महामारीचा अधिक गंभीर परिणाम झाला आहे. महामारीच्या काळात सरकारने जारी केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिजिटल शिक्षण घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
तेजपूर विद्यापीठाच्या संपूर्ण पथकाने विद्यापीठाच्या आजी, माजी आणि भविष्यातील सर्व विद्यार्थ्यांना एकतेच्या प्रेरणेने बांधून ठेवावे आणि विद्यापीठाने निर्धारित केलेल्या लक्ष्य पूर्तीच्या दिशेने वेगाने प्रगती करावी असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या प्रसंगी केले.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801339)
Visitor Counter : 214