गृह मंत्रालय
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज नवी दिल्ली येथे अनावरण केले
आपल्या पोलीस दलांसमोर सतत उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी क्षमता निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी पोलीस संशोधन आणि विकास विभाग वचनबद्ध आहे
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2022 5:00PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बीपीआर अँड डी अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज नवी दिल्ली येथे अनावरण केले. केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस.कौमुदी आणि बीपीआर अँड डी चे महासंचालक बालाजी श्रीवास्तव यांच्यासह गृह मंत्रालयाचे आणि पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले की बीपीआर अँड डी ही संस्था आपल्या पोलीस दलांसमोर सतत उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी क्षमता निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. नित्यानंद राय म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठीची एकछत्री योजना 2021-22 ते 2025-26 पर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेला केंद्राकडून 26,275 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस दलांच्या कार्यात सुधारणा करून दलांचे आधुनिकीकरण करण्याच्या केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळेल. ते म्हणाले की या निर्णयामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षितता, पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब , अंमली पदार्थ नियंत्रण तसेच मजबूत न्यायवैद्यक यंत्रणा यांच्या विकासातून गुन्हेगारीविरोधी न्याय यंत्रणा अधिक बळकट करण्यात मदत होईल.

केंद्रीय गृह राज्यमंत्री पुढे म्हणाले की, बीपीआर अँड डीच्या महासंचालकांनी आज अनावरण झालेल्या सर्व सहा पुस्तकांची थोडक्यात माहिती दिली आहे. उत्तम मानके आणि उत्कृष्ट पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून ते केल्याशिवाय कोणतीही संघटना आव्हानांना तोंड देऊ शकत नाही.
नित्यानंद राय म्हणाले की सायबर गुन्ह्यांविषयी समाजात जागृती निर्माण करणे अत्यावश्यक आहे . मात्र त्यासाठी प्रत्यक्ष समाजात काम करणाऱ्या आपल्या पोलीस दलांना त्याबद्दल प्रशिक्षण दिले जाणे तितकेच महत्त्वाचे आहे , जेणेकरून आपले पोलीस सायबर गुन्ह्यांच्या तपासात सक्रीय आणि परिणामकारक भूमिका निभावू शकतील. “सायबर क्राईम से परिचय”या हिंदी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनामुळे नव्याने उदयाला येत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्याचे आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. उपकरणांच्या व्यवस्थापनासाठी पोलीस दलाला असलेली मार्गदर्शकाची गरज भागविणाऱ्या शस्त्र आणि साधनांचा संग्रह देखील विभागाने प्रकाशित केला आहे.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801106)
आगंतुक पटल : 359