आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि निम-वैद्यकीय संस्था अथवा महाविद्यालयांमधील वैद्यकीय व्यावसायिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांसाठी जैववैद्यकीय अभिनव संशोधन आणि उद्योजकता या संदर्भातील आयसीएमआर/ डीएचआर धोरण जारी केले

Posted On: 24 FEB 2022 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्यासह आज नवी दिल्ली येथे, “वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि  निम-वैद्यकीय संस्था आणि महाविद्यालयांमधील वैद्यकीय व्यावसायिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांसाठी जैववैद्यकीय अभिनव संशोधन आणि उद्योजकता या संदर्भातील आयसीएमआर/ डीएचआर धोरण” जारी केले.

स्पर्धात्मक जागतिक पटलावर देशाची वाढ आणि विकास साधण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष हे कोणत्याही देशाला आवश्यक असणारे प्राथमिक स्तंभ आहेत  याकडे सर्वांचे लक्ष वेधत डॉ.मनसुख मांडविया म्हणाले, “भारताला आता वैद्यकीय साधनांसह संपूर्ण आरोग्य क्षेत्रात संशोधन, उद्योजकता आणि अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःचे सामर्थ्य आणि ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी या महत्त्वाच्या धोरणाचे कौतुक करून आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि डीएचआर अर्थात वैद्यकीय संशोधन विभाग यांचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या, “हे धोरण वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल  आणि या धोरणामुळे भारतात वैद्यकीय साधने आणि निदानविषयक उत्पादने यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील अभिनव संशोधनांची पाईपलाईन निर्माण होईल असा ठाम विश्वास मला वाटतो आहे.

या धोरणानुसार, स्टार्ट अप कंपन्या सुरु करून त्या कंपनीमध्ये बिगर कार्यकारी संचालक अथवा वैज्ञानिक अधिकाऱ्याचे सहाय्यक पद देऊन वैद्यकीय व्यावसायिक आणि डॉक्टरांना उद्योजकताविषयक संस्था सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. डॉक्टरांना एकट्याने अथवा कंपनीच्या माध्यमातून आंतर-संस्थात्मक आणि उद्योगसंबंधी प्रकल्प हाती घेण्यास परवानगी दिली जाईल तसेच विविध व्यापारी संस्थांना वैद्यकीय तंत्रज्ञानाचा परवाना देऊन स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी व्यावसायिकीकरण तसेच महसूल निर्मितीची सुरुवात करण्यात येईल. वैद्यकीय व्यावसायिकांना संस्थेच्या पूर्वपरवानगीसह त्यांच्या स्टार्ट अप कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाचे अनुवादात्मक काम अथवा व्यावसायिकीकरण करण्यासाठी काही काळासाठी कामातून विश्रांती घेण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. हे धोरण आंतरशाखीय सहकारी संबंध, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि कौशल्य विकास यांना प्रोत्साहन देईल आणि समाजाच्या भल्यासाठी उद्योजकता विकास तसेच मेक इन इंडिया उत्पादनांच्या विकासाची जोपासना करेल. डीएचआर-आयसीएमआर यांनी इतर सरकारी विभाग, विविध मंत्रालये तसेच डीपीआयआयटी, डीएसटी, डब्ल्यूआयपीओ, डीएसआयआर, एआयआयएमएस, आयआयटी दिल्ली या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून हे धोरण तयार केले आहे. हे धोरण म्हणजे वैद्यकीय संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण संशोधनासाठी आणि उद्योगांशी संबंधित कार्यात योगदान देण्याची क्षमता प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800857) Visitor Counter : 176