कोळसा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोल इंडिया लिमिटेडच्या ईआरपी प्रणालीचा शुभारंभ केला
कोल इंडिया लिमिटेडला चालू आर्थिक वर्ष तसेच पुढील आर्थिक वर्षांसाठीचे उत्पादन लक्ष्य गाठण्याचे केले आवाहन
Posted On:
24 FEB 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2022
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अद्ययावत माहिती तंत्रज्ञान सक्षम तंत्रज्ञानाची ओळख, त्याची शाश्वत आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचा व्यापक दृष्टीकोन कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा आणखी वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. काल एका कार्यक्रमात कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) च्या एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) प्रणालीच्या अंमलबजावणीचे उद्घाटन जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जनधन खाते सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान साधनांच्या प्रभावी वापराची आठवण करून दिली.
तंत्रज्ञान पारदर्शकता आणू शकते आणि भ्रष्टाचार कमी करू शकते, याकडे लक्ष वेधत जोशी म्हणाले की कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावाअंतर्गत कोळसा मंत्रालयाने आतापर्यंत 42 कोळसा खाण क्षेत्रांचा यशस्वी लिलाव केला आहे. देशात शाश्वत कोळसा पुरवठा सुनिश्चित करून अलीकडील आव्हानांवर यशस्वीपणे मात केल्याबद्दल त्यांनी कोल इंडियाची प्रशंसा केली. त्यांनी कोल इंडियाला चालू आर्थिक वर्षात आणि पुढील आर्थिक वर्षासाठी निर्धारित कोळसा उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचे आवाहन केले.
जोशी यांनी नवीन ईआरपी प्रणालीच्या वैशिष्ट्यपूर्ण लाभांवर भर दिला. ते म्हणाले की या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट सीआयएलला ऊर्जा क्षेत्रातील जागतिक कंपनी म्हणून प्रस्थापित करणे हे आहे. ईआरपी सर्वोत्तम व्यवसाय पद्धती स्थापित करेल, तसेच सीआयएल आणि त्याच्या उपकंपन्यांमध्ये व्यवसाय प्रक्रिया प्रमाणित करून त्यांचे एकत्रीकरण करेल असे ते म्हणाले. . कोल इंडियामध्ये ईआरपीची अंमलबजावणी डिजिटल आणि नवभारताच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांना चालना देईल, असे जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी जोशी यांच्यासह कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि कोळसा सचिव डॉ. अनिल कुमार जैन यांच्या हस्ते “फ्युएलिंग इंडियाज एनर्जी नीड्स” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडियाने केलेल्या शाश्वत प्रयत्नांचे वर्णन या पुस्तकात आहे.
ईआरपी हे माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचे एक उत्तम साधन आहे, यामुळे कोल इंडियाची व्यावसायिक कामगिरी सुधारण्यास आणि अचूक डेटा मिळण्यास तसेच खर्चात बचत करण्यास मदत होईल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800842)
Visitor Counter : 219