विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आपल्या वैज्ञानिक कामगिरीचे मर्म आणि भव्यता दर्शवणाऱ्या "विज्ञान सर्वत्र पूज्यते" या देशव्यापी कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि जी . किशन रेड्डी यांच्याकडून संयुक्तपणे उद्घाटन

Posted On: 22 FEB 2022 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2022

 

वैज्ञानिक साधनांच्या योग्य  वापरासाठी सांस्कृतिक मूल्ये जपणे  आवश्यक असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)भू  विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

आपल्या देशाच्या वैज्ञानिक कामगिरीचे मर्म आणि भव्यता दर्शवणाऱ्या "विज्ञान सर्वत्र पूज्यते" या देशव्यापी  कार्यक्रमाचे डॉ जितेंद्र सिंह आणि ईशान्य प्रदेशाचे केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज संयुक्तपणे उद्घाटन केले. 

देशात 75 ठिकाणी झालेल्या "विज्ञान सर्वत्र पूज्यते" च्या उद्घाटन समारंभात बोलतांना,  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, "आपल्या सांस्कृतिक  मूल्यांमध्ये भारताची  विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरी  समाविष्ट करण्याचे विज्ञान सर्वत्र पूज्यते" चे  उद्दिष्ट आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक विचार सामान्य माणसांपर्यंत नेणे हे देखील उद्दिष्ट आहे,जेणेकरून  तो वैज्ञानिक माहिती आणि नवसंशोधनाचा अवलंब  करून त्याचा लाभ घेऊ शकतो आणि त्यामुळे  वैज्ञानिक रुची विकसित करू शकतो, असेही ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी  भारतातील वैज्ञानिक प्रयोगशाळा तसेच वैज्ञानिक मनुष्यबळ आता जगात सर्वोत्तम प्रयोगशाळांशी  स्पर्धा करत असल्याकडे लक्ष वेधले.

राष्ट्रीय विज्ञान सप्ताह (22-28 फेब्रुवारी 2022) साजरा करण्यासाठी आणि सामान्य लोकांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी देशभरातील 75 वेगवेगळ्या शहरांमध्ये “विज्ञान सर्वत्र पूज्यते” (विज्ञानाप्रति सार्वत्रिक आदर) चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षातील कामगिरी उलगडून दाखवणाऱ्या  "स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव" चा भाग आहे. सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत  विज्ञान प्रसारने  प्रधान वैज्ञानिक सल्लागार (PSA) कार्यालय आणि भारत सरकारच्या इतर मंत्रालयांच्या  समन्वयाने याचे आयोजन  केले जात आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले,विज्ञान आणि त्यातील नवनवीन संशोधन ग्रामीण आणि शहरी क्षेत्र, आरोग्य, पायाभूत सुविधा, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांमधील बहुतेक समस्या सोडवू शकतात यावर आमच्या सरकारचा ठाम विश्वास आहे.  ते म्हणाले  की कोविड-19 संकटातही  भारतीय प्रयोगशाळा आणि आपल्या शेकडो वैज्ञानिकांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी रात्रंदिवस काम केले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, आम्ही केवळ 100% साक्षरता दर नाही तर 100% वैज्ञानिक साक्षरता दर साध्य करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

डॉ जितेंद्र सिंग यांनी एका युनिफाइड सायन्स मीडिया सेंटरच्या निर्मितीची घोषणा केली, जे विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अलिकडच्या घडामोडी सामान्य लोकांसमोर मांडेल  आणि आपल्या स्वतःच्या वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात सुरु असलेल्या संशोधन आणि नवकल्पना यावर लक्ष केंद्रित करेल.  ते म्हणाले, विज्ञान प्रसारासाठी तटस्थ नोडल एजन्सी, विज्ञान प्रसार यांना हा कार्यभार देण्यात आला आहे आणि युनिफाइड मीडिया सेंटर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि डिजिटल मीडियासह सर्व प्रकारच्या माध्यमांकडे लक्ष देईल.

या कार्यक्रमाची सांगता भव्य समारंभाने होईल. नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रमण  यांच्या स्मरणार्थ 1987 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनी समारोप होईल. 1930 मध्‍ये रमण यांनी  रमण इफेक्टचा शोध लावला. या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण पुरस्कार आणि महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. विज्ञान सर्वत्र पूज्यतेची माहिती www.vigyanpujyate.in वर उपलब्ध आहे.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800408) Visitor Counter : 297