विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत जगातला पसंतीचा स्टार्ट-अप देश म्हणून उदयाला येत आहे- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
भारताच्या पहिल्या टेक स्टार्ट-अप परिषद आणि पुरस्कार शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून केले मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2022 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2022
केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान;पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेली व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवस्था तसेच इथल्या अफाट क्षमतेमुळे भारत जगातील पसंतीचे स्टार्ट-अप ठिकाण म्हणून उदयाला येत आहे.

डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्ली येथे "इंडिया फर्स्ट टेक स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह-2022" आणि पुरस्कार शिखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, स्टार्ट-अपची भक्कम परिसंस्था भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्टार्ट-अप उपक्रमाची घोषणा केली होती, त्यानंतर
स्टँडअप इंडिया तसेच विविध दूरदर्शी उपक्रमांची घोषणा केली होती. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या विविध योजना आणि त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे 2021 मध्ये भारतात 10,000 स्टार्ट-अपची नोंदणी झाली. ते म्हणाले, भारतात आता 50,000 हून अधिक स्टार्ट-अप आहेत जे देशात 2 लाखांहून अधिक रोजगार पुरवतात.

“इंडिया फर्स्ट” या संकल्पनेबाबत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये, परिस्थितीनुसार भारताने स्वतःला आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आणि विकासक म्हणून सिद्ध केले आहे. भारतातील उद्योगांना भेडसावणाऱ्या डिजिटल, डेटा आणि तंत्रज्ञानातील अडथळ्यांकडे लक्ष वेधून ते म्हणाले, आपला देश तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक संधी खुल्या करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मॉडेल्सना सक्षम करत आहे.
डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते याप्रसंगी यशस्वी स्टार्ट-अपना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1799351)
आगंतुक पटल : 216