विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वामित्व योजनेंतर्गत 6 लाख गावांचे मॅपिंग आणि देशभरातील 100 शहरांचे 3D नकाशे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते भारतासाठी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे ठरेल: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह


जिओस्पेशिअल प्रणाली, ड्रोन धोरण आणि खुले अंतराळ क्षेत्र हे भारताच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचे वैशिष्ट्य असेल : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 15 FEB 2022 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत, ड्रोनसह जिओस्पेशिअल तंत्रज्ञान 6 लाखांहून अधिक भारतीय गावांचे सर्वेक्षण करेल. त्याच बरोबर 100 भारतीय शहरांसाठी 3D नकाशे तयार केले जातील, जे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे ठरेल, असेही ते म्हणाले.

जिओस्पेशिअल डेटा प्रकाशनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की,  जिओस्पेशिअल प्रणाली ड्रोन धोरण आणि खुले अंतराळ क्षेत्र हे भारताच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचे वैशिष्ट्य असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न साध्य करण्यासाठी राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांमध्ये या उदयोन्मुख  तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अनुरूप हे आहे असे ते म्हणाले.

जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर,   जिओस्पेशिअल उद्योग संघटनेचे अध्यक्ष अजेंद्र कुमार, जिओस्पेशिअल वर्ल्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार, मॅपमायइंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वर्मा, जेनेसिसचे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक साजिद मलिक, आयआयटी कानपूरचे प्रा. भरत लोहानी, गुगल, हेक्सागॉनचे प्रतिनिधी आणि इतर उद्योगांचे सदस्य आणि अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की मार्गदर्शक तत्त्वांच्या उदारीकरणातून एका वर्षाच्या कालावधीत खूप सकारात्मक परिणाम मिळाले असून जिओस्पेशिअल  धोरण लवकरच जाहीर केले जाईल. स्वामित्व योजनेंतर्गत 6 लाख गावांचे मॅपिंग करण्यासाठी भारतीय सर्वेक्षणाद्वारे जिओस्पेशिअल कंपन्यांच्या निवडीचे आवाहन आणि डिजिटल ट्विन्स या संकल्पनेवर आधारित 100 शहरांसाठी जेनेसिस इंटरनॅशनलने 3D नकाशा बनवण्याचे हाती घेतलेले काम ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असून यामुळे आमूलाग्र बदल घडून येईल असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, जिओस्पेशिअल तंत्रज्ञान हे देशाचे "डिजिटल चलन" आहे जे पायाभूत सुविधा, निर्मिती, आरोग्य, कृषी, शहरी नियोजन, महामार्ग आणि सेवा वितरण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये धडाडीने वापरले जाऊ शकते. ते म्हणाले, एका उद्योगाच्या अंदाजानुसार 2020 मध्ये भारतीय जिओस्पेशिअल बाजारपेठ  23,345 कोटी रुपये होती ज्यात 10,595 कोटी रुपये निर्यात होती जी 2025 मध्ये 36,300 कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अंतराळ, अणुऊर्जा, ड्रोन आणि मार्गदर्शक तत्त्वांद्वारे जिओस्पेशिअल डेटाचे उदारीकरण हे धाडसी निर्णय या उद्योगाच्या महत्वपूर्ण कामगिरीचे प्रमुख चालक आहेत असे ते म्हणाले.  

 

 

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1798560) Visitor Counter : 257