श्रम आणि रोजगार मंत्रालय

देशातील रोजगार संधींमध्ये वाढ होत आहे असे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन


टोक्यो पॅरालिंपिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत आणि रौप्यपदक विजेती भाविना पटेल या ईएसआयसीच्या कर्मचाऱ्यांचा केला गौरव

हरियाणामधील गुरगाव येथे झालेल्या ईएसआयसीच्या 187 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

Posted On: 12 FEB 2022 4:59PM by PIB Mumbai

 

नुकत्याच झालेल्या तिमाही रोजगारविषयक सर्वेक्षणाचे अहवाल आणि ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा वेतनपट अहवाल यांचा संदर्भ देऊन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव आज म्हणाले की देशातील रोजगार संधींमध्ये वाढ होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संघटीत आणि असंघटीत अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी आणि श्रमिक यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.

गुरगाव येथे आज दुपारी झालेल्या ईएसआयसी अर्थात कामगार राज्य विमा महामंडळाच्या 187व्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, ईएसआयसीचे प्रलंबित प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यात येतील आणि ईएसआयसीच्या रुग्णालयांचे बांधकाम, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी वर्गाची उपलब्धता यांचीही काळजी घेतली जाईल. ईएसआयसीच्या रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुधारणा करण्यात येईल याची ग्वाही देऊन केंद्रीय मंत्र्यांनी गरिबांच्या सेवेसाठी ईएसआयसीच्या रुग्णालयांमध्ये सेवा देण्याचे आवाहन डॉक्टरवर्गाला केले.

केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमात ईएसआयसी व्यवस्थापनाच्या बांधकाम प्रकल्पासाठीचा डॅशबोर्ड आणि रुग्णालयसंबंधी डॅशबोर्ड अशा दोन डॅशबोर्ड्सचे उद्घाटन केले. आरोग्यविषयक डॅशबोर्ड एका नजरेत ईएसआयसी रुग्णालयांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाची माहिती देईल तसेच त्यातून या रुग्णालयांमध्ये सध्या भरती असलेल्या रुग्णांची संख्या आणि बाह्यरुग्ण विभागाची परिस्थिती याबद्दल देखील माहिती घेता येईल. बांधकाम प्रकल्पासाठीचा डॅशबोर्ड ईएसआयसीच्या विविध बांधकाम प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी महत्त्वाची माहिती देईल.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यादव यांनी टोक्यो पॅरालिंपिक्स 2021 स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत आणि रौप्यपदक विजेती भाविना पटेल यांना  अनुक्रमे 1 कोटी आणि 50 लाख रुपयांचा चेक तसेच मानपत्र देऊन गौरव केला. हे दोघेही ईएसआयसीचे कर्मचारी आहेत. दोन्ही क्रीडापटूंनी अविरत पाठिंब्याबद्दल मंत्रीमहोदय आणि ईएसआयसी व्यवस्थापनाचे आभार मानले. येत्या काळातील स्पर्धांमध्ये अधिक उत्तम कामगिरी करण्यासाठी असेच प्रोत्साहन आणि पाठींबा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्त केली.

गुरगाव येथे झालेल्या ईएसआयसीच्या 187 व्या दोन दिवसीय बैठकीत झालेले निर्णय आणि चर्चा याबद्दल अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयएस रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग यांची मोठी कमतरता आहे असे या बैठकीत जाणवले. म्हणून, ईएसआयएस रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या 5000 डॉक्टर श्रेणीची पदे या वर्षात लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ईएसआयसी योजनेत अजूनही समाविष्ट नसलेल्या लागवड मजुरांना या योजनेतील आरोग्य सुविधांचे लाभ देण्यात यावेत अशी मागणी केली. देशभरातील कामगार आणि श्रमिक यांच्या कल्याणासाठी सरकार राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती देखील केंद्रीय मंत्री तेली यांनी उपस्थितांना दिली.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797941) Visitor Counter : 160