अल्पसंख्यांक मंत्रालय
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 810व्या उरुसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडून राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यावर ‘चादर’अर्पण
Posted On:
06 FEB 2022 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 810व्या उरुसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यावर ‘चादर’ अर्पण केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश वाचून दाखवला. पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या भारतातील आणि परदेशातील अनुयायांना या वार्षिक उरुसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या जगभरातील अनुयायांचे 810व्या उरुसाच्या निमित्ताने स्वागत आणि शुभेच्छा. अजमेर शरीफ येथे “चादर” अर्पण करून मी जगभरात मानवतेचा संदेश पोहोचवणाऱ्या महान सुफी संतांना अभिवादन करत आहे. विविधतेमधून एकता ही भारताची ओळख आहे. विविध पंथ, समुदाय यांचे सौहार्दपूर्ण सहअस्तित्व आणि विचारधारा हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
“महान संत-महात्मे, पीर, फकीर यांनी विविध कालखंडात देशाची सामाजिक सांस्कृतिक वीण बळकट करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. या वैभवशाली परंपरेत प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव अतिशय आदराने आणि श्रद्धेने घेतले जाते, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
आपल्या संदेशात पंतप्रधान पुढे म्हणतात की गरीब नवाझ यांचे तत्वज्ञान आणि सिद्धांत यापुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. एकात्मता आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला उरुस भाविकांमधील श्रद्धाभाव अधिक बळकट करेल. याच भावनेने मी अजमेर शरीफ येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या वार्षिक उरुसाच्या निमित्ताने देशाची समृद्धी आणि आनंद याकरिता कामना करतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेल्या ‘चादरी’चे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तंत्त्वज्ञान, दूरदृष्टी आणि सूफी संतांची संस्कृती आणि समावेशक सक्षमीकरणाबाबतची त्यांची वचनबद्धता हा भारताला “विश्वगुरू” बनवण्याचा प्रभावी मंत्र आहे, असे नक्वी यांनी यावेळी सांगितले.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795991)
अभ्यागत कक्ष : 251