पंतप्रधान कार्यालय

विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन

Posted On: 22 JAN 2022 11:18PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

कार्यक्रमाला उपस्थित असलेले देशाच्या विविध राज्यातले सन्माननीय मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, इतर सर्व सहकारी, राज्यांचे विविध मंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव आणि शेकडो जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त आणि इतर मान्यवर,

 

बंधू आणि भगिनींनो,

आयुष्यात आपण नेहमीच बघतो की लोक आपल्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतात, आणि काही प्रमाणात त्या आकांक्षा पूर्णही करतात. मात्र जेव्हा इतरांच्या आकांक्षा आपल्या आकांक्षा बनतात, ज्यावेळी इतरांची स्वप्ने पूर्ण करणे हे आपल्या यशाचे निकष बनतात, तेव्हा मग तो कर्तव्य पथाचा मार्ग इतिहास घडवणारा ठरतो. आज आपण देशातल्या विकासाची आकांक्षा असलेल्या जिल्ह्यात हाच इतिहास रचला जातांना बघतो आहोत. मला आठवतं, 2018 साली हे अभियान सुरु झालं होतं, त्यावेळी मी म्हटलं होतं, की जे भाग कित्येक दशकांपासून विकासापासून वंचित आहेत, त्या भागातल्या लोकांची सेवा करण्याची संधी हे एक सद्भाग्यच आहे. मला अतिशय आनंद आहे, की आज जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी आपण या अभियानाअंतर्गत केलेली यशस्वी कामगिरी सांगण्यासाठी इथे उपस्थित आहात. मी तुम्हा सगळयांचे या यशाबद्दल अभिनंदन करतो. तुमच्या नव्या उद्दिष्टांसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी मुख्यमंत्र्यांचे आणि राज्यांचेही विशेष अभिनंदन करतो. या राज्यांनी अनेक जिल्ह्यात गुणी आणि धडाडीच्या बुद्धिमान युवा अधिकाऱ्यांना नेमलं आहे. हे एक उत्तम धोरण आहे. त्याचप्रमाणे जिथे पदे रिक्त होती, तिथे ती पदे भरण्यालाही प्राधान्य दिले आहे. तिसरी गोष्ट मी पाहिली आहे, ती अशी की त्यांनी अशा अधिकाऱ्यांचा कार्यकाळही स्थिर ठेवला आहे. म्हणजे एकप्रकारे अशा आकांक्षित जिल्ह्यात उत्तम, गुणवान नेतृत्व, उत्तम टीम देण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आज शनिवार आहे, सुट्टीचा मूड असतो, तरीही सर्व आदरणीय मुख्यमंत्री वेळ काढून आपल्या या बैठकीत सहभागी झाले आहेत. आपण सगळेही, सुट्टी न घेता आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात. यातूनच कळते की अशा आकांक्षी जिल्ह्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात त्याविषयी किती महत्व आहे. आपापल्या राज्यात विकासाच्या प्रवाहात मागे राहिलेल्या अशा जिल्ह्यांना बरोबरीत आणण्यासाठी ते किती दृढनिश्चयी आहेत, याचाच  पुरावा आपल्याला यातून मिळतो.

 

मित्रांनो,

आपण पाहिले आहे की एकीकडे बजेट वाढतं, योजना तयार होत राहतात, आकडेवारीत आर्थिक विकासही दिसतो, मात्र तरीही, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात इतक्या मोठ्या प्रवासानंतर देखील देशातले अनेक जिल्हे मागे पडले आहेत. काळानुरूप या जिल्ह्यांना मागास जिल्हेअसं लेबल लागलं. एकीकडे देशातील शेकडो जिल्हे प्रगती करत आहेत, तर दुसरीकडे हे मागास जिल्हे अधिकाधिक मागास होत गेले. संपूर्ण देशाच्या प्रगतीच्या आकडेवारीवर देखील या जिल्ह्यांच्या आकडेवारीचा विपरीत परिणाम होतो. समग्र स्वरूपात ज्यावेळी परिवर्तन दिसत नाही, तेव्हा जे जिल्हे उत्तम प्रगती करत असतात, त्यांनाही निराशा येऊ शकते. हे लक्षात घेऊनच, देशाने, या मागास राहिलेल्या जिल्ह्यांना हात देत त्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं.आज असे आकांक्षी जिल्हे देशाला पुढे नेण्यात येणारे अडथळे संपवत आहेत. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांतून हे आकांक्षी जिल्हे आता गतिरोधकाऐवजी गतीवर्धक ठरत आहेत. जे जिल्हे आधी जलद गतीने प्रगती करणारे समजले जात होते, आज हे आकांक्षी जिल्हे अनेक निकषांवर त्यांच्यापेक्षा जास्त उत्तम काम करुन दाखवत आहेत. आज या बैठकीत इतके सन्माननीय मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत, ते ही मान्य करतील की त्यांच्या राज्यातल्या आकांक्षी जिल्ह्यांनी फार चांगले काम केले आहे.

 

मित्रांनो,

आकांक्षी जिल्ह्यांच्या विकासाच्या या अभियानात आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांचा ज्याप्रकारे विस्तार आणि पुर्नआरेखन केलं आहे, आमच्या संविधानामागचा जो विचार आहे आणि संविधानाचा जो आत्मा आहे, त्याला मूर्त स्वरूप देणारे हे काम आहे. या कामाचा आधार आहे - केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाचे सांघिक कार्य! याची ओळख आहे, संघराज्य व्यवस्थेत सहकार्याची वाढती संस्कृती. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात लोकसहभाग जितका अधिक असेल, तितकी या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, तिचे परिणाम अधिक सकारात्मक  असतील..

 

मित्रांनो,

आकांक्षी जिल्ह्यात विकास करण्यासाठी प्रशासन आणि जनतेदरम्यान एक थेट संबंध आणि एक भावनिक बंध असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच प्रशासनात वरुन खाली आणि खालून वर असे दोन्ही प्रकारचे प्रवाह असणे आवश्यक आहे. या अभियानाचा आणखी एक महत्वाचा पैलू आहे, तो म्हणजे तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पनांचा वापर. जे जिल्हे तंत्रज्ञानाचा जितका अधिक वापर करत आहेत, प्रशासन आणि अंमलबजावणीच्या जितक्या नव्या पद्धतींचा कल्पकपणे वापर करत आहेत, त्यांची कामगिरी अधिकाधिक सरस ठरते आहे. आज देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील आकांक्षी जिल्ह्यांच्या कितीतरी यशोगाथा आपल्यासमोर आहेत. आजच्या या बैठकीत मला पाचच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मात्र इतर सगळे जे इथे बसलेले आहेत, आज माझ्यासमोर शेकडो अधिकारी बसले आहेत. आणि प्रत्येकाकडे काही ना काही तरी यशोगाथा आहे. आता बघा, आमच्यासमोर आसामच्या दरांगचे, बिहारच्या शेखपूराचे, तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडमचे उदाहरण आहे. या जिल्ह्यांनी बघता बघता बालकांमधील कुपोषण पुष्कळ प्रमाणात कमी केले आहे. ईशान्येकडील आसामच्या गोलपारा आणि मणिपूरच्या चंदेल या जिल्ह्यांमधील पशूंच्या लसीकरणाचे प्रमाण चार वर्षात 20 टक्क्यांवरुन 85 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

बिहार मध्ये जमुई आणि बेगूसराय सारख्या जिल्ह्यात जिथे 30 टक्के लोकसंख्येला दिवसभरात महत्प्रयासाने एक बादली पिण्याचे पाणी मिळत असे, तिथे आता 90 टक्के लोकसंख्येला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत आहे. यामुळे किती गरीब, किती महिला, बालके आणि वृद्धांच्या आयुष्यात सुखद बदल झाला असेल, याची आपण कल्पना करु शकतो. आणि मी हे ही सांगेन की हे केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक आकड्यामागे आपल्यासारख्या गुणवान लोकांचे कित्येक तासांचे परिश्रम आहेत. कितीतरी मनुष्यबळ त्यासाठी खर्च झाले आहे. यामागे आपल्या सर्वांचे तप आणि तपस्या आणि घाम आहे. मला वाटतं, हा बदल, हे अनुभव आपल्या संपूर्ण आयुष्याची मिळकत आहे.

 

मित्रांनो,

आकांक्षी जिल्ह्यांत देशाला जे मोठे यश मिळत आहे, त्याचे एक मोठे कारण जर सांगायचे तर ते आहे, एकत्रित काम करणे - कामाचे अभिसरण! आत्ताच कर्नाटकच्या आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तुकड्यातुकड्यांमध्ये काम करण्याच्या पद्धतीतून कसे बाहेर पडावे. सगळी संसाधने तीच आहेत, सरकारी यंत्रणाही तीच आहे, अधिकारी देखील तेच आहेत, मात्र परिणाम वेगवेगळे आहेत. कोणत्याही जिल्ह्याकडे जेव्हा एक एककम्हणून बघितले जाते, जेव्हा जिल्ह्याचे भविष्य समोर ठेवून काम केले जाते, त्यावेळी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या कार्याच्या व्यापकतेची जाणीव होते. अधिकाऱ्यांना आपल्या भूमिकेचीही जाणीव होते. त्यांना त्यात आपल्या आयुष्याचे ध्येयगवसल्याची भावना येते. त्यांच्या डोळ्यांसमोर जे बदल होत जातात, आणि कामाचे जे परिणाम दिसतात, त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या आयुष्यात जे परिवर्तन घडते, ते पाहून अधिकाऱ्यांना, प्रशासनाशी संबंधित लोकांना त्याचे विलक्षण समाधान मिळते. आणि हे समाधान कल्पनेच्याही पलिकडचे असते, शब्दांच्या पलीकडले असते. मी स्वतः पाहिले आहे, जेव्हा कोरोना नव्हता, त्यावेळी मी कोणत्याही राज्यात जात असे, तेव्हा तिथल्या आकांक्षी जिल्ह्यांच्या लोकांना बोलवत असे. त्या अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधत असे, चर्चा करत असे. त्यांच्याशी अशा संवादामधूनच मला हा अनुभव आला आहे की अशा आकांक्षी जिल्ह्यात जे काम करत आहेत, त्यांच्यात काम करण्याविषयीच्या समाधानाची एक वेगळीच भावना निर्माण होते. आणि जेव्हा एक सरकारी काम, त्यांच्यासाठी आयुष्याचे एक जिवंत ध्येय बनून जाते, जेव्हा सरकारी यंत्रणा एक जिवंत एकक ठरते, काम करणारा सगळा चमू एका धेय्याने झपाटून काम करतो, संपूर्ण चमू एक कार्यसंस्कृती घेऊन पुढे जातो, त्यावेळी परिणामही तसेच येतात, जसे आपण या आकांक्षी जिल्ह्यात बघतो आहोत. एकमेकांना सहकार्य करत, एकमेकांच्या उत्तमोत्तम पद्धती सर्वांना सांगत, एकमेकांकडून शिकून घेत जी कार्यशैली विकसित होते तेच उत्तम प्रशासनाचे खूप मोठे भांडवल आहे.

 

मित्रांनो,

या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये जे काम झालं आहे, ते जगातील मोठमोठ्या विद्यापीठांसाठी देखील संशोधनाचा विषय आहे. गेल्या चार वर्षांत या प्रत्येक आकांक्षी जिल्ह्यातल्या जन-धन खात्यांमध्ये चार ते पाच पट वाढ झाली आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबाला शौचालय मिळालं आहे, प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. आणि वीज केवळ गरीबाच्याच घरात नाही पोहोचली, तर लोकांच्या आयुष्यातही ऊर्जेचा संचार झाला आहे. देशाच्या व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास वाढला आहे.

मित्रांनो, आम्हाला आपल्या या प्रयत्नातून बरेच काही शिकायचे आहे. एका जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याच्या यशापासून शिकायचं आहे, दुसऱ्यांसमोरची आव्हाने समजून घ्यायची आहेत.

 

मित्रांनो,

मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात चार वर्षांच्या आत गरोदर महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणी करण्याचे प्रमाण 37 टक्क्यांवरुन 97 टक्क्यांपर्यंत कसे वाढले? कसं अरुणाचलच्या नामसाई मध्ये, हरियाणाच्या मेवात मध्ये आणि त्रिपुराच्या धलाईमध्ये यंत्रणांकडून होणारी अंमलबजावणी 40 - 45 टक्क्यांवरून वाढून 90 टक्क्यांवर कशी पोहोचली? कर्नाटकच्या रायचूरमध्ये, नियमितपणे अतिरिक्त पोषण आहार मिळणाऱ्या गरोदर महिलांची संख्या 70 टाक्यांवरून वाढून 97 टक्के कशी झाली? हिमाचलच्या चंबामध्ये, ग्राम पंचायत स्तरावर सार्वजनिक सेवा केंद्राचं कार्यक्षेत्र 67 टक्क्यांवरून वाढून 97 टक्के कसं झालं आहे? किंवा मग, छत्तीसगडच्या सुकमामध्ये जिथे 50 टक्क्यांहून देखील कमी मुलाचं लसीकरण व्हायचं, तिथे आता 90 टक्के लसीकरण होत आहे. या सर्व यशोगाथांमध्ये, संपूर्ण देशातल्या प्रशासनाला शिकण्यासारख्या अनेक नवनवीन गोष्टी आहेत, अनेक नवनवीन धडे देखील आहेत.

 

मित्रांनो,

आपण तर बघितलंच आहे, आकांक्षी जिल्ह्यात जे लोक राहतात, त्यांच्या पुढे जाण्याची किती जिद्द असते, किती जास्त आकांक्षा असते. या जिल्ह्यांतल्या लोकांनी आपल्या आयुष्याचा बराच मोठा काळ कमतरतेत, अनेक संकटांचा सामना करत काढली आहेत. प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागत होती, संघर्ष करावा लागत होता. त्यांनी इतका काळोख बघितलेला असतो, की त्यातून बाहेर पडायची त्यांच्यात प्रचंड अधीरता असते. म्हणूनच ते लोक हिंमत दाखवायला तयार असतात, जोखीम घ्यायला तयार असतात आणि संधी मिळेल तेव्हा, त्याचा पूर्ण लाभ घेतात.

आकांक्षी जिल्ह्यांत जे लोक राहतात, जो समाज आहे, त्याची शक्ती आपण समजून घेतली पाहिजे, ओळखली पाहिजे. आणि मला असं वाटतं, याचा खूप मोठा प्रभाव आकांक्षी जिल्ह्यांत होणाऱ्या कामांवर दिसून येतो आहे. या क्षेत्रातील लोक देखील तुमच्या सोबत येऊन काम करत आहेत. विकासाची आस, सोबत चालण्याचा मार्ग बनते. आणि जेव्हा जनता ठरवते, प्रशासन ठरवते, तेव्हा कोणी कसं मागे राहू शकेल. तेव्हा केवळ पुढेच जायचं असतं, पुढेच जायचं असतं. आकांक्षी जिल्ह्यांतले लोक आज हेच करत आहेत.

 

मित्रांनो,

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून जनतेची सेवा करताना २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.  त्याआधीही, अनेक दशके मी देशाच्या विविध भागांतील प्रशासनाचे काम, त्याची कार्यपद्धती अगदी जवळून पाहिली आहे.  माझा अनुभव असा आहे की निर्णय प्रक्रियेतील चौकटींपेक्षा जास्त नुकसान, अंमलबजावणीतील चौकटी असतात, तेव्हा ते नुकसान भयंकर असते.  आणि आकांक्षीत जिल्ह्यांनी हे सिद्ध केले आहे की अंमलबजावणीतील चौकटी काढून टाकल्यामुळे, संसाधनांचा योग्य वापर होतो.  जेव्हा चौकटी दूर होतात तेव्हा ते 1+1, 2 होत नाही, जेव्हा चौकटी दूर होतात  तेव्हा ते 1 आणि 1, 11 होतात.  ही शक्ती, ही सामूहिक शक्ती आज आपण आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये पाहत आहोत.  आपल्या आकांक्षीत जिल्ह्यांनी हे दाखवून दिले आहे की जर आपण सुशासनाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन केले तर कमी संसाधनांमध्येही मोठे परिणाम साध्य करता येतात. आणि ज्या दृष्टीकोनातून हे अभियान राबवले गेले ते स्वतःच अभूतपूर्व आहे.  आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये देशातील पहिला दृष्टीकोन असा होता की या जिल्ह्यांच्या मूलभूत समस्या ओळखण्यासाठी विशेष कार्य केले गेले.  यासाठी लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या.  आमचा दुसरा दृष्टीकोन असा होता की - आकांक्षीत जिल्ह्यांच्या अनुभवांवर आधारित, आम्ही सतत कामकाजात सुधारणा केली.  आम्ही कामाची पद्धत ठरवली, ज्यामध्ये मोजता येण्याजोग्या निर्देशकांची निवड आहे, ज्यामध्ये जिल्ह्याच्या सद्य स्थितीची राज्य आणि देशाच्या सर्वोत्तम स्थितीशी तुलना केली जाते, ज्यामध्ये प्रगतीचे वास्तविक काळाचे निरीक्षण केले जाते. ज्याची इतर जिल्ह्यांशी निरोगी स्पर्धा आहे. उत्साह, उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न आहे.  या अभियाना दरम्यानचा तिसरा दृष्टीकोन म्हणजे आम्ही अशा प्रशासन सुधारणा केल्या ज्यामुळे जिल्ह्यांमध्ये एक प्रभावी संघ तयार करण्यात मदत झाली.  उदाहरणार्थ, नीती आयोगाच्या सादरीकरणात असे सांगण्यात आले की अधिका-यांच्या स्थिर कार्यकाळामुळे धोरणे अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यास खूप मदत झाली.  आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही सर्व स्वतः या अनुभवातून गेला आहात.  सुशासनाचा काय परिणाम होतो हे लोकांना कळावे म्हणून मी हे पुन्हा सांगितले.  जेव्हा आपण मूलभूत गोष्टींवर भर देण्याचा मंत्र पाळतो, तेव्हा त्याचे परिणामही मिळतात.  आणि आज मला यात आणखी एक गोष्ट जोडायची आहे.  प्रत्यक्ष जागेवर भेट देणे, पाहणी आणि रात्रीच्या मुक्कामासाठीही सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जावीत, त्यासाठी एक मॉडेल तयार केले जावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.  त्याचा तुम्हा सर्वांना किती फायदा होईल ते बघा.

 

मित्रांनो,

आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये मिळालेले यश पाहून देशाने आता आपले लक्ष्य आणखी वाढवले आहे.  आज, स्वातंत्र्याच्या अमृत काळात, देशाचे ध्येय आहे 100% सेवा आणि सुविधांची संपृक्तता!  म्हणजेच आपण आतापर्यंत जे यश मिळवले आहे त्यापुढेही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.  आणि मोठ्या प्रमाणावर काम करायचे आहे.  आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात रस्ते कसे पोहोचवता येईल, प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत आयुष्मान भारत कार्ड कसे पोहोचवता येईल , बँक खात्याची व्यवस्था कशी करता येईल, उज्ज्वला गॅस जोडणीपासून एकही गरीब कुटुंब वंचित राहू नये, प्रत्येक पात्र व्यक्तीला शासकीय विम्याचा लाभ मिळावा. निवृत्तीवेतन, घर यासारख्या सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कालबद्ध लक्ष्य असावे. याचप्रकारे प्रत्येक जिल्ह्याने पुढील दोन वर्षांचा आराखडा तयार करावा. सर्वसामान्यांचे जगणे सोपे होईल अशी पुढील 3 महिन्यांत पूर्ण होणारी कोणतीही 10 कामे तुम्ही ठरवू शकता.  त्याचप्रमाणे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन तुम्ही पूर्ण करु शकता अशी कोणतीही 5 कार्ये निश्चित करा.  ही कार्य या ऐतिहासिक काळातील तुमचे, तुमच्या जिल्ह्याचे आणि जिल्ह्यातील जनतेचे ऐतिहासिक यश बनले पाहिजे.  ज्याप्रमाणे देश आकांक्षीत  जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही जिल्ह्यातील विभाग (ब्लॉक) स्तरावर तुमचे प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे निश्चित करू शकता. ज्या जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे, त्या जिल्ह्याचे वैशिष्टय ओळखून तुम्हीही त्यात सहभागी व्हा.  या वैशिष्टयांमध्येच जिल्ह्याची क्षमता दडलेली आहे.  तुम्ही पाहिले असेल की, 'एक जिल्हा, एक उत्पादन' हे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवरच आधारित आहे.  आपल्या जिल्ह्याला राष्ट्रीय आणि जागतिक ओळख मिळवून देणे हे आपले ध्येय असायला हवे.  म्हणजेच तुमच्या जिल्ह्यांमध्येही वोकल फॉर लोकल हा मंत्र अंमलात आणा.  त्यासाठी जिल्ह्यातील पारंपारिक उत्पादने ओळखून, कौशल्ये ओळखून मूल्य साखळी मजबूत करावी लागेल.  डिजिटल इंडियाच्या रूपाने देश मूक क्रांतीचा साक्षीदार बनत आहे.  यामध्ये आपला कोणताही जिल्हा मागे राहू नये.  डिजिटल पायाभूत सुविधा आपल्या देशातील प्रत्येक गावात पोहोचल्या पाहिजेत, सेवा आणि सुविधा घरोघरी पोहोचवण्याचे साधन बनले पाहिजे हे खूप महत्वाचे आहे.

नीती आयोगाच्या अहवालात ज्या जिल्ह्यांची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्या जिल्ह्यांच्या डीएम, केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील.  मी नीती आयोगाला देखील सांगेन की तुम्ही अशी यंत्रणा बनवावी जेणेकरून सर्व जिल्ह्यांच्या डीएममध्ये नियमित संवाद होईल.  प्रत्येक जिल्ह्याला एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती अंमलात आणता यायला हव्यात.  केंद्राच्या सर्व मंत्रालयांनी विविध जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या सर्व आव्हानांचे दस्तऐवजीकरण करावे.  तसेच पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद योजना यामध्ये कशी मदत करू शकते ते पहा.

 

मित्रांनो,

आजच्या कार्यक्रमात मला तुमच्यासमोर आणखी एक आव्हान ठेवायचे आहे, मला एक नवीन ध्येय देखील द्यायचे आहे.  हे आव्हान देशातील 22 राज्यातील 142 जिल्ह्यांसाठी आहे.  विकासाच्या शर्यतीत हे जिल्हे मागे नाहीत.  हे आकांक्षीत जिल्ह्याच्या श्रेणीतही नाहीत.  ते खूप पुढे आले आहेत.  पण अनेक मापदंडांच्या कसोटीवर पुढे असूनही एक-दोन निकषांमधे ते मागे आहेत.  आणि म्हणूनच मी मंत्रालयांना सांगितले की ते त्यांच्या संबंधित मंत्रालयांमध्ये अशा गोष्टी शोधू शकतात.  काहींनी दहा जिल्हे शोधले, काहींनी चार जिल्हे शोधले, काहींनी सहा जिल्हे शोधले, ठीक आहे, आता इतकंच आलं आहे.  जसे की असा एखादा जिल्हा आहे जिथे सर्व काही चांगले आहे पण कुपोषणाची समस्या आहे.  त्याचप्रमाणे एका जिल्ह्यात सर्व निर्देशांक ठीक असले तरी तो शिक्षणात मागे आहे.  सरकारच्या विविध मंत्रालयांनी, विविध विभागांनी अशा 142 जिल्ह्यांची यादी तयार केली आहे.  एखाददोन निकषांवर हे वेगवेगळे 142 जिल्हे मागे आहेत, आता तिथेही आपल्याला आकांक्षीत जिल्ह्यांप्रमाणेच सामूहिक दृष्टिकोन ठेवून काम करायचे आहे. भारत सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, सरकारी यंत्रणा या सर्वांसाठी ही एक नवीन संधी आहे, नवीन आव्हान आहे.  आता हे आव्हान आपल्याला मिळून पूर्ण करायचे आहे.  यामध्ये मला माझ्या सर्व मुख्यमंत्री सहकार्‍यांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे, भविष्यातही ते मिळत राहील, असा माझा पूर्ण विश्वास आहे.

 

मित्रांनो,

सध्या कोरोनाचा काळही सुरू आहे.  कोरोनाची तयारी, त्याचे व्यवस्थापन आणि कोरोनामध्येही विकासाचा वेग कायम राखणे यात सर्व जिल्ह्यांची भूमिका महत्वाची आहे.  या जिल्ह्यांतील भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन आतापासूनच काम केले पाहिजे.

 

मित्रांनो,

आपल्या ऋषीमुनींनी म्हटले आहे - ''जल बिन्दु निपातेन क्रमशः पूर्यते घट:'' म्हणजे थेंबाथेंबाने पूर्ण घट भरतो.  त्यामुळे आकांक्षीत जिल्ह्यांतील तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमच्या जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल.  मी येथे, संबंधित नागरी सेवा सहकाऱ्यांना आणखी एक गोष्टीचे स्मरण देऊ इच्छीतो. या सेवेतील तुमचा पहिला दिवस होता, तो दिवस आठवावा.  तुम्हाला देशासाठी किती काही करायचे होते, किती उत्साहाने भारलेला होतात, किती सेवाभावाने भारलेला होतात.  आज त्याच भावनेने पुढे जायचे आहे.  स्वातंत्र्याच्या या अमृतकालामध्ये, करण्यासारखे खूप काही आहे.  प्रत्येक आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासाने देशाची स्वप्ने पूर्ण होतील.  स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण पाहिलेले नवीन भारताचे स्वप्न, ते पूर्ण करण्याचा मार्ग आपल्या या जिल्ह्यांतून आणि खेड्यांमधून जातो.  मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार नाही.  जेव्हा देश आपली स्वप्ने पूर्ण करेल, तेव्हा त्या सुवर्ण अध्यायात तुम्हा सर्व मित्रांची

मोठी भूमिका असेल.  या विश्वासाने, सर्व मुख्यमंत्र्यांचे आभार मानून, मी तुम्हा सर्व तरुण सहकाऱ्यांचे आपापल्या जीवनात केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या परिणामसिद्धीबद्दल अभिनंदन करतो, मी तुमचे मनापासून आभार मानतो! २६ जानेवारीचा दिवस तोंडावर आहे, त्या संबंधित कामाचाही ताण असतो, जिल्हाधिकाऱ्यांवर अधिक ताण असतो.  कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही रणांगणात आघाडीवर आहात.  आणि अशा परिस्थितीत मी तुम्हाला शनिवारी तुम्हा सर्वांसोबत वेळ देण्याचा थोडासा त्रास देत आहे, पण तरीही आज ज्या उमेदीने आणि उत्साहाने तुम्ही सर्वजण जोडलेले आहात, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.  मी तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो!  मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो!

***

S.Patil/V.Ghode/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791981) Visitor Counter : 267