संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साधला संवाद


तरूणांना एकसंध आणि शिस्तबद्ध शक्तीमध्ये रूपांतरित करून  एनसीसी उत्तम सेवा करीत आहे: संरक्षण मंत्री

Posted On: 22 JAN 2022 7:46PM by PIB Mumbai

 

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.  आपल्या छात्रांमध्ये एक नेता, सैनिक, कलाकार, संगीतकार आणि सर्वात उत्तम माणूस हे गुण राष्ट्रीय छात्र सेना रूजवत असल्याबद्दल त्यांनी या संघटनेचे कौतुक केले. या छात्रांमध्ये अनेक गुण विकसित केले जात असल्यामुळे भविष्यात हे छात्र स्वतःचा मार्ग तयार करू शकणार आहेतच त्याचबरोबर समाजालाही नवीन दिशा देऊ शकणार आहेत, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. छात्रांनी जीवनाचा उद्देश शोधावा आणि त्यासाठी संघटनेमध्ये शिकविण्यात येणारे ऐक्य, शिस्त, खरेपणा, धैर्य, एकोपा आणि नेतृत्व या गुणांचा अवलंब करून समाजामध्ये आपल्या कार्यातून ठसा उमटविणा-या एनसीसीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. तरूणांना एकसंध आणि शिस्तबद्ध शक्तीमध्ये रूपांतरित करून  एनसीसी उत्तम सेवा करीत आहे, असेही  संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.

कठोर परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे सांगून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छात्रांनी मत्सर,प्रांत, धर्म, जात आणि वर्ग यांच्याविषयीच्या पूर्वग्रहांमुळे फूट पाडली जाणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीचा यावेळी दाखला दिला. ते म्हणाले, ‘‘ विवेकानंद यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही नरकेसरी आहात, तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुमच्यामध्ये अनंत क्षमता आहेत आणि तुम्ही परिपूर्ण आहात, या संपूर्ण विश्वाचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे.तुमच्यासारख्या छात्रांनी भव्य स्वप्ने पहावीत आणि  भीती आणि संशय अशा बंधनांना झुगारून त्या स्वप्नांच्या पूर्तीचे ध्येय साध्य करावे, त्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अजूनही कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांबरोबर आभासी माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली कँटोन्मेंटच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये छात्रांनी संरक्षण मंत्र्यांच्या स्वागतपर शत शत नमनहे रंगतदार गीत  सादर केले. यावर्षीच्या रक्षा मंत्री पदकाची आणि प्रशस्तीपत्रक विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. एनसीसीचे डीजी लेफ्टनंट गुरबीरपाल सिंग आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यंदाचे रक्षा मंत्री पदक दिल्ली संचालनालयाच्या छात्र दिव्यांशी आणि कर्नाटक आणि गोवा संचालनालयाचे लेफ्टनंट अक्षय दीपकराव मंडलिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुजरात संचालनालयाचे छात्र कॅप्टन धीरज सिंह, महाराष्ट्र संचालनालयाचे सीयूओ सोमेश मनोज सिन्हा, ईशान्य क्षेत्र संचालनालयाचे सीयूओ केएच मोनिता सिंघा आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम संचालनालयाचे छात्र आदर्श शर्मा यांना रक्षा मंत्री कमेंडेशन कार्ड प्रदान करण्यात येणार आहे.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791829) Visitor Counter : 274