सांस्कृतिक मंत्रालय

भारतीयांच्या हृदयात नेताजींचे अढळ स्थान होते, आहे आणि यापुढेही कायम राहील : डॉ. अनिता बोस फाफ


युवकांनी आपल्या मनात देशाला सर्वोच्च स्थान द्यावे अशी नेताजींची इच्छा होती: रेणुका मलाकर

Posted On: 21 JAN 2022 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त  सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, पत्र सूचना कार्यालय आणि क्षेत्रीय लोक संपर्क विभाग, जयपूर यांनी "पराक्रम दिवस" संबंधी एक वेबिनार आयोजित केले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असलेला 23 जानेवारी हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. डॉ अनिता बी फाफ  (नेताजी सुभाषचंद्र  बोस यांची कन्या) आणि रेणुका मलाकर (नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात) आजच्या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाल्या होत्या. महेशचंद्र शर्मा (ज्येष्ठ पत्रकार) यांनीही वेबिनारला अतिथी वक्ते म्हणून संबोधित केले.

जर्मनीहून वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या डॉ. अनिता बोस फफ म्हणाल्या की, भारतीयांच्या हृदयात नेताजींचे अढळ स्थान होते, आहे आणि यापुढेही कायम राहील. त्या म्हणाल्या की, नेताजी स्त्री-पुरुष समानतेचे समर्थक होते. पुरुष आणि महिलांना केवळ समान अधिकारच नाहीत तर समान कर्तव्येही बजावता येतील असे राष्ट्र निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात, नेताजी सुभाष बोस आय एन ए ट्रस्ट दिल्ली-इंडियाच्या माजी सरचिटणीस आणि विद्यमान विश्वस्त रेणुका मलाकर यांनी सांगितले की, नेताजींचे आपल्या देशबांधवांवर नितांत प्रेम होते. भारतीय युवक हे देशाचे भविष्य आहेत. युवकांनी आपल्या मनात देशाला सर्वोच्च स्थान द्यावे आणि तसे झाले तर भारताची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर अधिक विस्तृतपणे बोलताना ज्येष्ठ पत्रकार व लेखक महेश चंद्र शर्मा म्हणाले की, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे राष्ट्राप्रती  समर्पण भारतीय युवकांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहील.

वेबिनारच्या सुरुवातीला, पत्र सूचना कार्यालयाच्या  अतिरिक्त महासंचालक (क्षेत्र) डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर, यांनी उद्घाटनपर स्वागत भाषण केले. त्या म्हणाल्या की, नेताजींच्या अदम्य भावनेचा आणि देशाप्रति निःस्वार्थ सेवेचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी, देशातील लोकांना विशेषतः तरुणांना प्रेरित करण्यासाठी केंद्र  सरकारने त्यांची जयंती 23 जानेवारी हा दिवस दरवर्षी “पराक्रम दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबिनारमध्ये 200 हून अधिक जण सहभागी झाले होते. यात बीएसएफचे जवान, एनसीसीचे कॅडेट्स, नेहरू युवा केंद्र संघटनेचे युवा स्वयंसेवक आणि देशाच्या विविध भागांतील इतर अधिकारी यांचा समावेश  होता. वेबिनारच्या अखेरीस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बनवलेला व्हिडिओ दाखवण्यात आला. पत्र सूचना कार्यालय जयपूरचे उपसंचालक पवनसिंग फौजदार यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले.


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791666) Visitor Counter : 223