पंतप्रधान कार्यालय

त्रिपुराच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 21 JAN 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

नॉमॉश्कार !

खुलुमखा !

राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्रिपुराच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन ! त्रिपुराच्या स्थापना आणि विकासासाठी योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचे आदरपूर्वक अभिनंदन करतो, त्यांच्या प्रयत्नांना वंदन करतो.

त्रिपुराचा इतिहास नेहमीच महत्वपूर्ण आणि शानदार असा राहिला आहे. माणिक्य वंशाच्या सम्राटांच्या पराक्रमापासून  आतापर्यन्त एक राज्य म्हणून त्रिपुराने आपली भूमिका सशक्त केली आहे. आदिवासी समाज असो किंवा अन्य  समुदाय, सर्वांनी त्रिपुराच्या विकासासाठी पूर्ण मेहनतीने आणि एकजुटतेने  प्रयत्न केले आहेत. माता त्रिपुरासुंदरीच्या आशीर्वादाने त्रिपुराने प्रत्येक आव्हानाचा हिंमतीने सामना केला आहे.

त्रिपुरा आज विकासाच्या ज्या नव्या युगात नवी उंची गाठण्याच्या दिशेने पुढे जात आहे, त्यात त्रिपुराच्या जनतेच्या समंजसपणाचे खूप मोठे योगदान आहे. सार्थक परिवर्तनाची तीन वर्ष याच सामंजस्याचे प्रमाण आहेत.  आज त्रिपुरा संधींची भूमी बनत आहे. आज त्रिपुराच्या सामान्य माणसांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुहेरी इंजिनाचे सरकार निरंतर काम करत आहे. त्यामुळेच विकासाच्या अनेक मापदंडाच्या बाबतीत आज त्रिपुरा उत्तम कामगिरी करत आहे. आज मोठ्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून हे राज्य व्यापार केंद्र बनत आहे. गेली अनेक दशके त्रिपुराकडे उर्वरित भारताशी जोडले जाण्याचा रस्ते हा एकमात्र मार्ग होता. पावसाळ्यात जेव्हा दरडी कोसळल्यामुळे रस्ते बंद व्हायचे, तेव्हा त्रिपुरासह संपूर्ण ईशान्य प्रदेशात आवश्यक सामानाची खूपच टंचाई  जाणवायची. आज रस्त्यांबरोबरच रेल्वे, हवाई अंतर्गत जलमार्ग यासारखी अनेक माध्यमं त्रिपुराला मिळत आहेत. राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत त्रिपुरा बांगलादेशातील चितगाव बंदरात प्रवेश मिळावा अशी मागणी करत होते. दुहेरी इंजिनच्या सरकारने मागणी पूर्ण केली. 2020 मध्ये अखौरा एकात्मिक चेक पोस्टवर बांगलादेशमधून प्रथमच मालवाहतूक पोहचली. रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत त्रिपुरा देशातल्या अव्वल  राज्यांमध्ये स्थान मिळवत आहे ₹. काही दिवसांपूर्वीच महाराजा बीर विक्रम विमानतळाचा देखील विस्तार करण्यात आला.

मित्रांनो,

एकीकडे त्रिपुरा गरीबांना पक्की घरे देण्यात प्रशंसनीय काम करत आहे तर दुसरीकडे नवीन तंत्रज्ञान देखील वेगाने  आत्मसात करत आहे. गृह बांधणीच्या क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग देशाच्या सहा राज्यांमध्ये होत आहे, त्यापैकी त्रिपुरा हे एक आहे. गेल्या तीन वर्षात जी कामे झाली ती तर केवळ सुरुवात आहे. त्रिपुराच्या खऱ्या सामर्थ्याचा सामना, ते सामर्थ्य पूर्ण ताकदीनिशी प्रकट करणे, ते सामर्थ्य समोर येणे अद्याप बाकी आहे. प्रशासनात पारदर्शकता पासून आधुनिक पायाभूत सुविधा पर्यंत, आज ज्या त्रिपुराची निर्मिती होत आहे, ती आगामी दशकांसाठी राज्याला तयार करेल. बिप्लब देब जी आणि त्यांची टीम अतिशय मेहनतीने काम करत आहे. अलिकडेच त्रिपुरा  सरकारने प्रत्येक गावापर्यंत विविध सुविधा 100% पोचवण्याचे अभियान सुरू केले आहे. सरकारचे हे प्रयत्न त्रिपुराच्य लोकांचे जीवन सुलभ करण्यात खूप मदत करतील. जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्रिपुरा आपल्या स्थापनेची 75 वर्षे पूर्ण करेल. नव्या संकल्पांसाठी, नवीन संधींसाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. आपण आपली कर्तव्ये पार पाडत पुढे जायचे आहे. आपण सर्वांनी मिळून विकासाची गती कायम ठेवायची आहे याच विश्वासासह तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद!

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791543) Visitor Counter : 204