विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सीएसआयआरने नव्याने विकसित केलेले निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान रेल्वे डबे, वातानुकूलित बसगाड्या, बंदिस्त जागांमध्ये वापरण्यात येत आहे- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

सार्स-सीओव्ही-2 संसर्ग रोखण्यासाठीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाविषयी सीएसआयआरच्या मार्गदर्शक सूचना सिंग यांनी केल्या जारी

Posted On: 17 JAN 2022 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2022

 

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने नव्याने विकसित केलेले निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान रेल्वे डबे, वातानुकूलित बसगाड्या, बंदिस्त जागा इत्यादी ठिकाणी वापरण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज दिली.

विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने सीएसआयआर-सीएसआयओ (केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था) मार्फत विकसित केलेले यूव्ही-सी  तंत्रज्ञान हे हवेतून होणाऱ्या सार्स-सीओव्ही-2 जंतूंच्या प्रसारास अटकाव करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली असून कोरोनोत्तर काळातही त्याची उपयुक्तता कमी होणार नाही, असे डॉ.सिंग यांनी स्पष्ट केले. रेल्वे, वातानुकूलित बसगाड्या आणि संसदभवनातही हे तंत्रज्ञान वापरले गेले असून ते यशस्वी ठरले आहे. आता सर्वसामान्यांना वापरण्यासाठी येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सार्स-सीओव्ही-2 प्रसार थांबवण्याचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाच्या वापराविषयी सीएसआयआरच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर डॉ.जितेंद्र सिंग बोलत होते. 'तथापि, निर्जंतुकीकरणाचे हे तंत्रज्ञान बसवल्यावरही प्रत्येकाने कोविड प्रतिबंधासाठीच्या मास्क-अंतर-गर्दी टाळणे याविषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे', असा इशाराही त्यांनी दिला.

पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांकरिता प्रचारसभा आणि रोड-शो घेण्यावर विशिष्ट काळासाठी बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येसह होणाऱ्या बंदिस्त जागेतील बैठकांसाठी हे तंत्रज्ञान वापरून निर्जंतुकीकरण करण्याबद्दल सीएसआयआर निवडणूक आयोगाला पत्राद्वारे सुचवेल, असेही डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले. हवा निर्जंतुक करणारी ही यूव्ही-सी प्रणाली प्रेक्षागृहे, मोठ्या आकाराची सभागृहे, वर्गखोल्या, मॉल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, जेणेकरून सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात बंदिस्त ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.


* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1790589) Visitor Counter : 79