रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 17 जानेवारी 2022 रोजी दक्षिण विभागासाठीच्या पंतप्रधान गतिशक्ती परिषदेचे होणार उद्घाटन

Posted On: 15 JAN 2022 10:16PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आखलेल्या कृती योजना आणि प्रकल्प यांची माहिती देण्यासाठी मंत्रालय येत्या 17 जानेवारी 2022 रोजी दक्षिण विभागासाठीच्या पंतप्रधान गतिशक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आभासी पद्धतीने आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. या परिषदेमध्ये महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, पुदुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणा हो राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी तसेच इतर भागधारकांच्या सहभागातून पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर तज्ञ व्यक्तींच्या पथकांच्या चर्चा होतील.

पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रम यशस्वी करण्यात राज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. राज्य सरकारांशी समन्वय साधून, पायाभूत सुविधा उभारणाऱ्या सर्व मंत्रालयांना प्रकल्पांचे योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी राज्य पातळीवर पंतप्रधान गतिशक्ती योजनेची संस्थात्मक चौकट निर्माण करणे आणि राज्यांना यासंदर्भातील योजनेचा नकाशा तयार करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यातूनच, या योजनेची कार्यक्षम अंमलबजावणी होईल आणि निश्चित कालावधीत प्रकल्प पूर्ण करता येतील.

सरकारी विभागांमधील अडथळे दूर करणे आणि दळणवळणाच्या बहुविध पद्धती तसेच  सर्वदूर संपर्क यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने अधिक समग्र आणि समावेशक नियोजन आणि प्रकल्पांची अंमलबजावणी शक्य करणे या उद्देशाने पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमुळे, मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यास मदत होईल आणि ही बचत ग्राहक, शेतकरी, तरुण वर्ग आणि व्यापार करणाऱ्या सर्वांकडे मोठ्या आर्थिक फायद्याच्या रुपात हस्तांतरित करता येईल.

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1790237) Visitor Counter : 209