पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 12 जानेवारी रोजी 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे करणार उद्घाटन


युवा नेतृत्वाखाली विकासाच्या अनुषंगाने उदयोन्मुख काळातल्या समस्या आणि आव्हानांचा सामना करताना, युवकांना प्रेरणा देण्यासाठी, विविध संकल्पनांवर महोत्सवामध्ये करणार चर्चा

ऑलिम्पिकपटू आणि पॅराऑलिम्पिकपटूंबरोबर मुक्त संवाद साधता येणार

पंतप्रधान ‘‘मेरे सपनों का भारत’’ आणि ‘‘अनसंग हिरोज् ऑफ इंडियन फ्रीडम मुव्हमेंट’’ या विषयावरील निवडक निबंधांचे करणार अनावरण

पंतप्रधान एमएसएमई तंत्रज्ञान केंद्र आणि पेरूंथालाईवर कामराजर मणिमंडपम् - सभागृह आणि खुल्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करणार

Posted On: 10 JAN 2022 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता पुद्दुचेरी येथे होत असलेल्या  25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमाव्दारे होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

भारतातल्या युवकांच्या मनाला आकार देऊन त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभागी करून घेताना एका संघटित शक्तीमध्ये रूपांतरीत करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  सामाजिक एकता आणि सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीने बौद्धिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर चिंतन घडवून आणण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. भारतामधील सांस्कृतिक वैविध्य लक्षात घेऊन ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’  या समान सूत्रामध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचे उद्दिष्टही यामागे आहे. 

यावर्षी कोविडचा देशभरामध्ये झालेला उद्रेक लक्षात घेऊन दि. 12 आणि 13 जानेवारी, 2022 असे दोन दिवस या महोत्सवाचे आभासी स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर राष्ट्रीय युवा संमेलन होणार आहे. त्यामध्ये चार संकल्पनांवर समूह चर्चा होणार आहे.युवकांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या अनुषंगाने आजच्या काळातल्या समस्या आणि आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी तरूणांना प्रेरणा देणा-या संकल्पनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण, हवामान, शाश्वत विकास उद्दिष्टे, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवकल्पना, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्राचे चारित्र्य, राष्ट्र उभारणी आणि आपल्या देशाला समृद्ध बनविणे, यांच्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये सहभागी होत असलेल्यांना पुद्दुचेरीचे ऑरोविले, इमिर्सिव्ह सिटी एक्सपिरीअन्स, देशी क्रीडाप्रकार, लोकनृत्य यांच्याविषयांवरील ध्वनिचित्रमुद्रित फीत दाखवण्यात येणार आहे. तसेच ऑलिम्पिकपटू आणि पॅराऑलिम्पिकपटूंबरोबर मुक्त संवाद साधता येणार आहे. यानंतर संध्याकाळचा  कार्यक्रम होणार आहे. सकाळी आभासी योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या युवा महोत्सवामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘‘मेरे सपनों का भारत’’, ‘‘अनसंग हिरोज् ऑफ इंडियन फ्रीडम मुव्हमेंट’’ म्हणजेच ‘‘माझ्या स्वप्नातला भारत’’ आणि ‘‘ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनाम वीर’’  या विषयावरील निवडक निबंधांचे अनावरण करण्‍यात येणार आहे. या दोन विषयांवर सुमारे एक लाखांपेक्षा जास्त तरूणांनी आपले निबंध सादर केले. त्यामधून या निबंधांची निवड करण्यात आली आहे.

पुद्दुचेरी येथे अंदाजे 122 कोटी रूपये खर्चून एमएसएमई मंत्रालयाने तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या केंद्राची स्थापना करताना इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केंद्र आहे. युवकांच्या कौशल्य विकसनामध्ये हे केंद्र महत्वपूर्ण योगदान देईल. दरवर्षी सुमारे 6400 प्रशिक्षणार्थींना या केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुद्दुचेरी सरकारच्यावतीने सुमारे 23 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पेरूंथालाईवर कामराजर मणिमंडपम या खुल्या प्रेक्षागृहाचे आणि सभागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या  हस्ते होणार आहे. या दोन्हीचा वापर प्रामुख्याने शैक्षणिक हेतूसाठी करण्यात येणार असून त्याची एक हजारांपेक्षा जास्त लोकांना समावून घेण्याची क्षमता आहे.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788912) Visitor Counter : 260