आयुष मंत्रालय
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आयुष मंत्रालय करणार जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन
मकर संक्रांतीनिमित्त 75 लाख लोक सूर्यनमस्कार घालणार- आयुष मंत्रालयाचा उपक्रम
Posted On:
09 JAN 2022 3:10PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालय दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी जागतिक स्तरावर 75 लाख लोकांसाठी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.(मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या उत्तर गोलार्धातील भ्रमणास प्रारंभ करतो,या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.) हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि आनंद दिल्याबद्दल 'मदर नेचर'चे (निसर्ग जननीचे) आभार मानण्याचा दिवस आहे. या दिवशी,सर्व सजीवांचे पालनपोषण करणाऱ्या सूर्याला नमन करण्यासाठी आणि त्याच्या प्रत्येक किरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'सूर्य नमस्कार' घातले जातात. सूर्य, उर्जेचा मूलस्त्रोत असून, केवळ अन्न-साखळी अविरतपणे सुरू ठेवण्यासाठीच महत्वाचा नसून, तो सर्व माणसांच्या मनाला आणि शरीराला ऊर्जा देखील पुरवितो. वैज्ञानिकदृष्ट्या, सूर्यनमस्कार रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आणि चैतन्यवृद्धी साठी आवश्यक आहेत, जे या महामारीच्या परिस्थितीत आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो, ज्याची जगभरातील सर्व वैद्यकीय शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिफारस केली जाते.
सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचा संदेश देण्याचाही प्रयत्न असेल. आजच्या जगात जेथे हवामानविषयक जाणीव असणे अत्यावश्यक आहे, दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा (हरित ऊर्जा) मिळाल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल.
याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत मकर संक्रांतीचे असलेले महत्त्व अधोरेखित करेल. सूर्यनमस्कार हा 8 आसनांचा एक संच आहे जो शरीर आणि मनाच्या समन्वयाने 12 चरणांमध्ये केला जातो. हे शक्यतो पहाटे केले जातात.
नोंदणीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या:
https://www.75suryanamaskar.com
https://yogacertificationboard.nic.in/suryanamaskar/
https://yoga.ayush.gov.in/suryanamaskar
***
R.Aghor/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788744)
Visitor Counter : 277