गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून माणिपूरमधल्या 2,450 कोटी रुपये मूल्याच्या 29 विकास कार्यांचे उद्‌घाटन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना माणिपूरमध्ये सगळीकडे विकासाची गंगा आणण्यात यश – अमित शाह

गेल्या पांच वर्षात, माणिपूरमध्ये कुठेही रास्ता रोको, बंद, झाला नाही, हिंसाचार देखील बऱ्याच अंशी नियंत्रणात आला आहे, जोपर्यंत स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत विकास अशक्य आहे

आज 265 कोटी रुपयांच्या 15 प्रकल्पांचे लोकार्पण आणि 2,194 कोटी रुपयांच्या 14 प्रकल्पांचे भूमीपूजन झाले

केवळ दोन दिवसांत, माणिपूरच्या लोकांसाठी 5,500 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु झाले

Posted On: 06 JAN 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून माणिपूरमधल्या 2,450 कोटी रुपयांच्या 29 प्रकल्पाचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमाला माणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच, माणिपूरच्या लोकांसाठी 3,000 कोटी रुपयांच्या  21 प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन केले. तसेच, पांच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची कोनशिलाही ठेवली. पंतप्रधानांनी, पेयजल,आरोग्य, नागरी विकास, माहिती-तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती अशा क्षेत्रासाठी विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. आजया कार्यक्रमात, 265 कोटी रुपयांच्या 15 प्रकल्पांचे लोकार्पण आणि 2,194 कोटी रुपयांच्या 14 प्रकल्पांचे भूमीपूजन झाले. केवळ दोन दिवसात, माणिपूरच्या लोकांसाठी, 5,500 कोटी रुपयांच्या विविध योजना सुरु झाल्या आहेत. आधीच्या सरकारच्या काळात, केवळ दोन दिवसांत 5,500 कोटी रुपयांच्या योजना सुरु करण्यात आल्या होत्या का? असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला.

येत्या काळात  सेंद्रिय पदार्थांचे महत्व वाढणार आहे. याच दिशेने, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने, ईशान्य भारतासाठीच्या सेंद्रिय अभियानाअंतर्गत, सैनजेनथोंग इथे  सेंद्रिय पदार्थांची दुकाने, शीतगृहे, आणि पॅकेजिंग विभाग सुरु करण्यात आले आहेत, असे अमित शाह यांनी संगितले.

आधीच्या सरकारांचे पूर्ण लक्ष केवळ राजकारणात होते,शस्त्रास्त्र घेऊन उभ्या असलेल्या फुटीरतावादी गटांना पाठिंबा दिला, खंडणी, अपहरण, अमली पदार्थांचा वापर आणि बंद यातून लोकांना त्रास दिला. आता मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि माणिपूर मधील एन बिरेन यांचे सरकार या डबल इंजिन सरकारने एकत्रितरित्या माणिपूर मध्ये विकासाचा प्रवाह आणला आहे, असे गृहमंत्री म्हणाले. आम्ही या राज्याच्या सर्व मागण्या जाणल्या आणि त्या मान्य करुन त्यावर अंमलबजावणी देखील केली.

आधीच्या सरकारच्या काळात तीन आय- म्हणजे अस्थिरता, घुसखोरी आणि विषमता (Instability, Insurgency and Inequality) होती, आताही तीन आय आहेत- नवोन्मेष, पायाभूत सुविधा आणि एकात्मता ( Innovation, Infrastructure and Integration) या गोष्टी आहेत, यामुळेच, ईशान्य भारत आणि देश प्रगतीपथावर जाऊ शकेल, असे गृहमंत्री म्हणाले.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1788180) Visitor Counter : 217