पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
"भारताच्या इतिहासात, मेरठ हे केवळ शहर नाही तर संस्कृती आणि सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण केंद्र"
देशात खेळांची जोमाने वाढ होण्यासाठी युवकांचा खेळावर विश्वास असायला हवा आणि, खेळाला व्यवसाय बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे. हा माझा संकल्प आणि माझे स्वप्नही आहे”
"गावे आणि लहान शहरांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे, या ठिकाणांहून खेळाडूंची संख्या वाढत आहे"
“संसाधने आणि नवीन शाखांसह उदयोन्मुख क्रीडा परिक्षेत्र नवीन शक्यता निर्माण करत आहे.यामुळे खेळाडू होणे हा योग्य निर्णय आहे असा विश्वास समाजात निर्माण होतो”
“मेरठ केवळ स्थानिकांना संधीच देत नाही तर स्थानिकांना जागतिक बनवत आहे”
“आपले ध्येय स्पष्ट आहे- तरुणांनी त्यांचे आदर्श ओळखावेत, आणि त्याच स्वतःही एक आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा"
Posted On:
02 JAN 2022 4:38PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.
स्वतंत्र भारताला नवी दिशा देण्यात मेरठ आणि आसपासच्या प्रदेशाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे, सभेत भाषण करताना पंतप्रधानांनी नमूद केले.या प्रदेशातील लोकांनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर बलिदान दिले आणि खेळाच्या मैदानात देशाची प्रतिष्ठा वाढवली, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशाने देशभक्तीची ज्योत तेवत ठेवली आहे, असेही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
''भारताच्या इतिहासात मेरठ हे केवळ शहर नाही तर संस्कृती आणि सामर्थ्याचे महत्त्वाचे केंद्र आहे,”असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य संग्रहालय, अमर जवान ज्योत आणि बाबा औघरनाथजींच्या मंदिराबद्दलची भावना पाहून पंतप्रधानांनी आपला आनंद व्यक्त केला.
मेरठमध्ये आपले कर्तृत्व गाजवणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. काही महिन्यांपूर्वी, केंद्र सरकारने देशातील सर्वात मोठ्या क्रीडा पुरस्काराला या क्रीडा क्षेत्रातील आदर्शाचे नाव दिले आहे. मेरठचे क्रीडा विद्यापीठ आज मेजर ध्यानचंद यांना समर्पित करण्यात येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पूर्वी जिथे गुन्हेगार आणि माफियांचा खेळ चालत असे अशा उत्तर प्रदेश राज्यामधील सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. बेकायदेशीर धंदे, मुलींचा छळ करून गुन्हेगारसहीसलामत सुटायचे तो काळ आणि पूर्वीच्या काळातील असुरक्षितता आणि अराजकता, याअ परिस्थितीची त्यांनी आठवण करुन दिली. आता मात्र, योगी सरकारने अशा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण केला असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या बदलामुळे मुलींमध्ये संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
युवक हा नव्या भारताचा पाया आणि विस्तारही आहे.तरूणाई ही नव्या भारताला आकार देणारी आणि नेतृत्व करणारी आहे. आजच्या तरुणांना प्राचीनतेचा वारसा आहे आणि आधुनिकतेची जाणीवही आहे आणि त्यामुळे तरुण ज्या दिशेने जातील, त्या दिशेने भारतही जाईल.आणि भारत जिथे जाईल तिथे जग जाणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या काही वर्षांत त्यांच्या सरकारने भारतीय खेळाडूंना संसाधने, प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव आणि निवडीतील पारदर्शकता या चार गोष्टी मिळवून देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशातील खेळांचा उत्कर्ष होण्यासाठी युवकांचा खेळावर विश्वास असायला हवा आणि खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. “हा माझा संकल्प आहे आणि माझे स्वप्नही! आमच्या तरुणांनी इतर व्यवसायांप्रमाणे खेळाकडे पहावे अशी माझी इच्छा आहे,” ते म्हणाले. सरकारने खेळांना रोजगाराशी जोडल्याची टिप्पणी पंतप्रधानांनी केली. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (TOPS) सारख्या योजना क्रीडा क्षेत्रातील निपूण व्यक्तींना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सर्व प्रकारचे पाठबळ देत आहेत. खेलो इंडिया अभियानामुळे नैपुण्य लवकर ओळखून त्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी सर्व सहकार्य केले जात आहे. ऑलिम्पिक आणि पॅरा-ऑलिम्पिकमध्ये भारताची अलीकडील कामगिरी ही क्रीडा क्षेत्रात नव भारताच्या उदयाचा पुरावा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. खेडे आणि लहान शहरांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा आल्याने, या शहरांमधून खेळाडूंची संख्या वाढत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे. खेळांना आता विज्ञान, वाणिज्य किंवा इतर अभ्यासक्रमाच्या पंक्तीत ठेवण्यात आले आहे. यापूर्वी खेळांना अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून गणले जात होते, परंतु आता शाळांमध्ये खेळ हा नियमित विषय असेल, असे पंतप्रधान म्हणाले. क्रीडा, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा लेखन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादींचा समावेश असलेली क्रीडा परिसंस्था नवीन संधी निर्माण करते. त्यामुळे खेळाकडे वाटचाल करणे हाच योग्य निर्णय असल्याचा विश्वास समाजात निर्माण होतो, असे ते पुढे म्हणाले. संसाधनांसह क्रीडा संस्कृती आकार घेते आणि क्रीडा विद्यापीठ यामध्ये मोठी भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले. मेरठच्या क्रीडा संस्कृतीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी लक्ष वेधले की हे शहर 100 हून अधिक देशांमध्ये क्रीडासाहित्य निर्यात करते. उदयोन्मुख क्रीडा क्लस्टर्सच्या माध्यमातून देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की अशाप्रकारे, मेरठ केवळ स्थानिक उत्पादनांनाच प्रोत्साहन देत नाही तर त्यांना जागतिक स्तरावरही नेत आहे.
उत्तर प्रदेशातील डबल इंजिन सरकार अनेक विद्यापीठे स्थापन करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी गोरखपूरमधील महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ, प्रयागराजमधील डॉ. राजेंद्र प्रसाद विधी विद्यापीठ, लखनौमधील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस, अलिगढमधील राजा महेंद्र प्रताप सिंग राज्य विद्यापीठ , सहारनपूरमधील मां शाकंबरी विद्यापीठ आणि मेरठमधील मेजर ध्यानचंद विद्यापीठ यांचा उल्लेख केला. “आमचे ध्येय स्पष्ट आहे. तरुणांनी केवळ आदर्श बनू नये तर त्यांचे आदर्श देखील ओळखले पाहिजेत,” आस मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, स्वामित्व योजनेअंतर्गत 75 जिल्ह्यांमध्ये 23 लाखांहून अधिक मालमत्ता कागदपत्रे (घरौनी) लोकांना देण्यात आली आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश मधून 12 हजार कोटी रुपये किमतीचे इथेनॉल खरेदी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
सरकारची भूमिका पालकासारखी असते, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. सरकारने गुणवत्ताधारकांना प्रोत्साहन द्यावे आणि चुकांना तरुणांचा मूर्खपणा ठरवण्याचा प्रयत्न करू नये. तरुणांसाठी विक्रमी सरकारी नोकऱ्या निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी सध्याच्या उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन केले. आयटीआयमधून प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार देण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, लाखो तरुणांनी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ घेतला आहे. मेरठ हे गंगा द्रुतगती मार्ग, प्रादेशिक रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टम आणि मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटीचे केंद्र बनत आहे.
***
R.Aghor/S.Chavan/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786959)
Visitor Counter : 458
Read this release in:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada