संरक्षण मंत्रालय
बीआरओचे मुख्य अभियंते आणि उपकरण व्यवस्थापकांच्या वार्षिक परिषदेचे संरक्षण सचिवांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन
बीआरओ च्या इंडिया@75 विशेष मोटरसायकल मोहिमेच्या सांगतेनंतर बाईकस्वारांचे स्वागत
Posted On:
27 DEC 2021 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2021
नवी दिल्लीत आज, 27 डिसेंबर 2021 रोजी सुरु झालेल्या बीआरओ म्हणजे सीमा रस्ते संघटनेचे मुख्य अभियंते आणि उपकरण व्यवस्थापकांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांच्या हस्ते झाले. बीआरओचे संचालक, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी, अतिरिक्त महासंचालक आणि 18 मुख्य अभियंते (प्रकल्प) या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे सर्व जण या तीन दिवसीय परिषदेत सहभागी झाले आहेत. जवळपास दोन वर्षांनी ही परिषद होत असून, त्यातून बीआरओच्या कोअर म्हणजेच, गाभा सदस्य समूहाला सीमावर्ती भागातील रस्ते बांधणी सुधारण्याविषयीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच रस्तेबांधणीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर, त्याशिवाय पर्यावरणपूरक साधनांचा बांधकामासाठी उपयोग करणे, रस्ते सुरक्षेविषयक पैलू आणि मंजुरांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याविषयी देखील या परिषदेत चर्चा होईल. या परिषदेदरम्यान, सध्या सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेतला जाईल आणि 2022 मध्ये प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीचे धोरण निश्चित केले जाईल.
यावेळी बोलतांना, संरक्षण सचिवांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामाचे कौतूक केले. देशाची सुरक्षा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा, जसे रस्ते, पूल, बोगदे आणि विमानतळांची बांधणी करत राष्ट्रउभारणीत बीआरओ महत्त्वाचे योगदान देत आहे, असे त्यांनी सांगितले. बीआरओ च्या योगदानामुळेच, अत्यंत दुर्गम भागात, सैन्यदलांना आपले मनुष्यबळ आणि शशस्त्रांची ने-आण करता येत आहे, सीमावर्ती भागांना मुख्य प्रदेशांशी जोडणारे 102 नवे रस्ते आणि पूल एकाच वर्षात बांधून पूर्ण करणाऱ्या बीआरओ च्या कर्तृत्वाचीही त्यांनी प्रशंसा केली. अतिशय कठीण प्रदेश, विपरीत हवामान आणि कोविड महामारी अशी संकटे असूनही बीआरओने हे काम चोखपणे पूर्ण केले, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मुख्य कार्यक्रमानंतर डॉ अजय कुमार यांनी इंडिया@75 या बीआरओ च्या विशेष मोटारसायकल मोहिमेच्या यशस्वी सांगतेनंतर आलेल्या बाईकस्वारांचे स्वागत केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत इंडिया गेट इथून 14 ऑक्टोबर रोजी या मोहिमेची सुरुवात केली होती.
बीआरओचे 75 कर्मचारी या 75 दिवसांच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी या मोहिमेत 24 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशातल्या महत्वाच्या खिंडी आणि जागांवरुन 20 हजार किमी चा प्रवास पूर्ण केला. या मोहिमेचा उद्देश, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रबांधणी आणि रस्ते सुरक्षाविषयक संदेश लोकांपर्यंत पोहचवणे हा होता.
* * *
M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785564)
Visitor Counter : 206