संरक्षण मंत्रालय
लखनौमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र तसेच ब्रह्मोस उत्पादन केंद्राची संरक्षण मंत्र्यांनी केली पायाभरणी
Posted On:
26 DEC 2021 4:48PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 डिसेंबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ ) स्थापन केलेल्या संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र तसेच ब्रह्मोस उत्पादन केंद्राची पायाभरणी केली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत दोन्ही कारखान्यांची पायाभरणी करण्यात आली.उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिका (युपीडीएआयसी) मध्ये संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन क्लस्टर्सच्या विकासाला गती देण्यासाठी सुमारे 22 एकरांवर अशा प्रकारचे पहिले संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र (डीटीटीसी ) स्थापित केले जात आहे. यात खालील सहा उपकेंद्रांचा समावेश असेल:
1. डीप-टेक नवोन्मेष आणि स्टार्टअप इनक्युबेशन केंद्र
2. डिझाइन आणि सिम्युलेशन केंद्र
3. चाचणी आणि मूल्यमापन केंद्र
4. इंडस्ट्री 4.0/डिजिटल उत्पादन केंद्र
5. कौशल्यविकास केंद्र
6. व्यवसाय विकास केंद्र
ब्रह्मोस एरोस्पेसने घोषित केलेले ब्रह्मोस उत्पादन केंद्र हे उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या लखनौ भागातील आधुनिक, अत्याधुनिक सुविधा केंद्र आहे. 200 एकर क्षेत्रावर हे उत्पादन केंद्र उभारण्यात येईल आणि नवीन ब्रह्मोस-एनजी (पुढची श्रेणी) स्वरूप तयार करेल. हे स्वरूप ब्राह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीला पुढे घेऊन जाईल. हे नवीन केंद्र पुढील दोन ते तीन वर्षांत तयार होईल आणि दरवर्षी 80-100 ब्राह्मोस-एनजी क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू करेल.
"आपण कधीही आक्रमक नव्हतो, मात्र शत्रुत्वाचा हेतू असलेल्या कोणत्याही राष्ट्रापासून आपल्या लोकांचे रक्षण करण्यास सज्ज आहोत", असे भारताच्या इतिहासाचे स्मरण करताना, राजनाथ सिंह यांनी सांगितले. ब्रह्मोस स्वनातीत जहाज क्षेपणास्त्र प्रणालीचा उद्देश प्रतिरोधक म्हणून काम करणे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ही प्रणाली केवळ भारत आणि रशियामधील तांत्रिक सहकार्यच दर्शवत नाही, तर दीर्घकालीन सांस्कृतिक, राजकीय आणि राजनैतिक संबंध देखील प्रतिबिंबित करते. 21 व्या शतकात भारताची विश्वासार्ह प्रतिरोधक सामर्थ्य बळकट करणारे ब्राह्मोस हे जगातील सर्वोत्तम आणि वेगवान अचूक- गायडेड क्षेपणास्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रह्मोसने सशस्त्र दलांना अधिक सक्षम केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लष्करी दर्जा उंचावला आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
***
G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785331)
Visitor Counter : 289