युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया यांनी पानिपतमधील शाळांमध्ये पंतप्रधानांनी सुचवलेल्या ‘मीट द चॅम्पियन्स’उपक्रमात भाग घेतला, भारताला अव्वल राष्ट्र बनवण्यासाठी मुलांनी योग्य आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याचे केले आवाहन

Posted On: 23 DEC 2021 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

ठळक वैशिष्ट्य

  • बजरंग यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, तंदुरुस्तीचे महत्त्व सांगितले.
  • हा अनोखा उपक्रम सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग आहे. याची सुरुवात गुजरातमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांनी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या अनोख्या शाळा भेट मोहिमेला पुढे नेत, भारतीय कुस्तीपटू आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते बजरंग पुनिया यांनी गुरुवारी हरियाणात पानिपत येथील आरोही मॉडेल स्कूलला भेट दिली आणि चार जिल्ह्यातील 75 शाळांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

बजरंग यांनी भेटीदरम्यान,विद्यार्थ्यांना संतुलित आहार, तंदुरुस्तीचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांसोबत खो-खो या खेळात सहभागी होऊन भारतीय पारंपारिक खेळांना प्रोत्साहन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना काही सोपे व्यायाम प्रकारही दाखवले.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंना देशभरातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सांगण्याच्या पंतप्रधानांच्या कल्पनेचे कौतुक करून बजरंग म्हणाले, "मी या शाळेत आलो याचा मला खूप आनंद झाला आहे, यामुळे मला माझ्या  शाळेच्या दिवसांची आठवण झाली. कारण मी ही हरियाणातील खेडेगावातून आलो आहे. इथे परत येणे म्हणजे शाळेत परत येण्यासारखे आहे."

योग्य आहार आणि तंदुरुस्त जीवनशैलीचे पालन करण्याच्या महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांशी बोलताना बजरंग म्हणाले, "तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल आणि भारताला कोणत्याही क्षेत्रात अव्वल स्थानावर पाहायचे असेल, तर तुम्हाला योग्य ते खाणे आणि  दिवसातून दोनदा किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे.

हा अनोखा उपक्रम सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांनी याची  सुरुवात केली.

बजरंग यांनी हिरव्या भाज्या, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, खनिजे यांसारखे  आवश्यक घटक असलेले घरगुती अन्न खाण्याच्या गरजेवर भर दिला. मुलांनी जंक फूडपासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केले.  "माझ्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्हाला आमच्या प्रशिक्षण केंद्रातून दररोज बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, म्हणून जेव्हा आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळायची तेव्हा आम्हाला पहिली गोष्ट करायची असायची ती म्हणजे चाट आणि टिक्कीसारखे चवदार अन्नपदार्थ खाणे. आणि तेही  बर्‍याच महिन्यांतून एकदाच, नियमितपणे नाही. म्हणून, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही नियमितपणे जंक फूड खाणार नाही, आणि तुम्ही ते सोडून देण्याचा प्रयत्न कराल."

मीट द चॅम्पियन्स ही विशेष शाळा मोहीम शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे.  येत्या काही महिन्यांत, आपले ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक तारे देशभरातील विविध शाळांना भेट देतील आणि विद्यार्थ्यांशी अशाच पद्धतीने संवाद साधतील.  त्यांच्या भेटीदरम्यान, खेळाडू त्यांचे स्वतःचे अनुभव, जीवनाचे धडे, योग्य आहार कसा घ्यावा यावर मार्गदर्शन करतील आणि शालेय मुलांना एकूणच प्रेरणादायी प्रोत्साहन देतील.

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784625) Visitor Counter : 217