गृह मंत्रालय
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या शिबीर परिसराचे औपचारिक उद्घाटन केले आणि नवीन परिसराची पाहणी केली, तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळा परिसरातील नव्या इमारतीचे लोकार्पण केले
अमित शाह यांनी एनडीआरएफ़च्या जवानांबरोबर भोजन घेतले आणि त्यांच्याशी संवादही साधला
आज संपूर्ण जगात सर्वात उत्तम आणि सर्वात मोठ्या निवारण दलांमध्ये एनडीआरएफची गणना होत आहे, ही बाब संपूर्ण देशासाठी आणि भारत सरकारसाठी अतिशय अभिमानास्पद आहे
सीएफएसएल अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे मनुष्यबळ देखील आपण वाढवू, त्याचबरोबर न्यायवैद्यक पुरावे त्वरित थेट न्यायालय आणि पोलीस ठाण्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोहचतील हे देखील सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करू
Posted On:
19 DEC 2021 7:06PM by PIB Mumbai
केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या शिबीर परिसराचे औपचारिक उद्घाटन केले आणि नवीन परिसराची पाहणी केली, तसेच फॉरेंसिक साइंस लैबोरेट्री सेंटर अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळा परिसरातील नव्या इमारतीचे लोकार्पण केले. अमित शाह यांनी एनडीआरएफ़च्या जवानांबरोबर भोजन घेतले आणि त्यांच्याशी संवादही साधला . केन्द्रीय गृह सचिव आणि एनडीआरएफ़च्या महासंचालकांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. एनडीआरएफ़च्या नवनिर्मित परिसरात जवानांसाठी बराक , मेस, अधिकारी आणि जवानांसाठी निवासी घरे, शाळा, रुग्णालय, एटीएम, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हेलिपॅड सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
याप्रसंगी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ हे विश्वासाचे प्रतीक आहे आणि त्याची केवळ उपस्थिती ही लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करते. एवढ्या कमी कालावधीत एनडीआरएफ च्या 16 बटालियन संपूर्ण देशात आपले काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या देशात आणि एवढ्या कठीण क्षेत्रात इतक्या कमी अवधीत हा विश्वास निर्माण करणे खूप कठीण आहे आणि जेव्हा सेनाप्रमुखापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण त्याच्या कार्यासाठी समर्पित असेल तेव्हाच हे शक्य होते. श्री. शहा म्हणाले की, तुम्ही अल्पावधीतच देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून ही कीर्ती केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये पसरली आहे. एनडीआरएफला अनेक वेळा परदेशातही पाठवण्यात आले आणि तेथेही खूप चांगले परिणाम बघायला मिळाले आणि तुम्ही तिथून भारतासाठी खूप चांगला संदेश आणला आहे.
श्री अमित शाह म्हणाले की एनडीआरएफची स्थापना 2006 मध्ये झाली आणि त्यावेळी आठ बटालियन होत्या ज्यात बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ मधील जवानांचा सहभाग होता. आज या दलाच्या देशभरात 16 बटालियन आणि 28 शहरांमध्ये प्रादेशिक प्रतिसाद केंद्रे आणि प्रादेशिक प्रतिसाद पथके देखील आहेत. आज एनडीआरएफची गणना संपूर्ण जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठ्या आपत्ती निवारण दलांमध्ये केली जात आहे, ही संपूर्ण देशासाठी आणि भारत सरकारसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे समर्पण, इतिहास आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
आज पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचेही लोकार्पण झालं आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, यांनी सांगितले.आतापर्यंत देशातल्या सात केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा देशात स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी गुजरातच्या न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेला जागतिक दर्जानुसार अद्ययावत बनवण्यासाठी, अतिशय परिश्रम घेऊन, नियोजन केले होते. आज गुजरातची न्यायवैद्यक प्रयोगशाळा जगातील सर्वोत्तम प्रयोगशाळांपैकी एक मानली जाते. प्रत्येक राज्यात सरकारने एक-एक महाविद्यालय बनवावे आणि या विद्यापीठाशी ते संलग्न करावे, असे आमचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, देशभरात, न्यायवैद्यक महाविद्यालयांचे एक जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच, तिथे प्रशिक्षित झालेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या आधारावर, देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये तीन चार न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात. यानंतर शहरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाव्यात, ज्या प्रत्येक पोलीस स्थानकांशी जोडलेल्या असतील. ज्या दिवशी आपण हे उद्दिष्ट साध्य करु, त्या दिवशी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण खूप वाढेल आणि आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा आणि गुन्हेनियंत्रण या दोन्हीसाठी मोठी मदत मिळेल, असा मला विश्वास आहे, असे अमित शाह म्हणाले.
आज आपण जे पेरणार आहोत, त्याचाच पुढे वटवृक्ष बनणार आहे. आणि हे बीज पेरण्याचे काम मोदी सरकार करत आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळांमधील मनुष्यबळ वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच, वैज्ञानिक पुरावे लवकरात लवकर, थेट न्यायालये आणि पोलिस स्थानकांपर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोचवले जावेत, हे ही आम्ही सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करु. आज देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. जसे के अमली पदार्थ, शस्त्रास्त्र तस्करी, बनावट नोटा, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, इत्यादी गुन्ह्यांची उकल करण्यातही न्यायवैद्यक प्रयोगशाळांची मोठी मदत होऊ शकते, असे अमित शाह म्हणाले.
***
Jaydevi PS/S.Patil/S.Kane/V.Joshi/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783251)
Visitor Counter : 293