पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 19 डिसेंबर रोजी गोव्याला देणार भेट आणि गोवा मुक्ती दिन सोहळ्यात होणार सहभागी


पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’ मधील योद्ध्यांचा करणार सत्कार

गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, पुनर्विकसित आग्वाद तुरुंग संग्रहालयाचे पंतप्रधान करणार उद्घाटन

पंतप्रधान गोव्यात 650 कोटींहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

देशभरात अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे उद्घाटन

Posted On: 17 DEC 2021 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर रोजी गोव्याला भेट देतील आणि दुपारी 3 वाजता गोवा येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास उपस्थित राहतील.  या कार्यक्रमात पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मधील योद्ध्यांचा सत्कार करतील. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

नूतनीकरण केलेले अग्वाद किल्ला कारागृह संग्राहलय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई कौशल्य विकास केंद्र (एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर) आणि दाबोळी-न्हावेली, मुरगांव येथील गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चचीही ते पायाभरणी करतील.

वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा आणि देशभरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो.  या दृष्टीकोनातूनच, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना योजनेअंतर्गत 380 कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. संपूर्ण गोवा राज्यातील हे एकमेव अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय आहे, जे उच्च श्रेणीतील सुपर स्पेशालिटी सेवा प्रदान करते. येथे अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलिसिस इत्यादी विशेष सेवा प्रदान केल्या जातील. सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये पीएम-केअर अंतर्गत स्थापित 1000 एलपीएम पीएसए प्लांट देखील असेल.

सुमारे 220 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या न्यू साउथ गोवा जिल्हा रुग्णालयात ओपीडीसह, 33 तज्ञ सेवा उपलब्ध आहेत, हे अत्याधुनिक निदान आणि प्रयोगशाळा सुविधा आणि फिजिओथेरपी, ऑडिओमेट्री इत्यादी सेवांसह आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयात 500 ऑक्सिजनयुक्त बेड, 5500 लीटर एलएमओ टाकी आणि 600 एलपीएमचे 2 पीएसए प्लांट आहेत.

स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वारसा पर्यटन स्थळ म्हणून आग्वाद कारागृह संग्राहलयाचा पुनर्विकास, 28 कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून करण्यात आला आहे.  गोवा मुक्तीपूर्वी, आग्वाद किल्ल्याचा वापर स्वातंत्र्यसैनिकांना कैदेत ठेवण्यासाठी आणि छळ करण्यासाठी केला जात होता. गोवा मुक्तीसाठी लढलेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि बलिदान हे संग्रहालय अधोरेखित करेल आणि त्यांना ही योग्य श्रद्धांजली असेल.

निर्माणाधीन असलेल्या मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर, सुमारे  8.5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हवाई क्षेत्रातील 16 वेगवेगळ्या कामांचे प्रशिक्षण देण्याचे याचे उद्दिष्ट आहे. मोपा विमानतळ प्रकल्प कार्यान्वित होण्यामुळे प्रशिक्षणार्थींना तिथे तसेच भारतातील आणि परदेशातील इतर विमानतळांवर नोकरीच्या संधी मिळू शकतील.

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत दवर्ली-न्हावेली, मडगाव येथे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन सुमारे 16 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.  ते दवर्ली, नेसाई, न्हावेली, आके-बायसो आणि ताळोली या गावांना अखंडीत वीज पुरवठा करेल.

सरकारद्वारे, गोव्याला उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याच्या अनुषंगाने बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टची इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च, स्थापन केली जाईल.

गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक विशेष लिफाफा आणि विशेष शिक्का देखील जारी करतील.  इतिहासाचा हा विशेष भाग विशेष लिफाफ्यावर दर्शविला गेला आहे, तर विशेष शिक्क्यावर "ऑपरेशन विजय" मध्ये आपले प्राण अर्पण केलेल्या सात तरुण शूर खलाशी आणि इतर कर्मचार्‍यांच्या स्मरणार्थ बांधलेले भारतीय नौदल जहाज गोमंतक येथील युद्ध स्मारकाचे चित्रण केले आहे.  

गोवा मुक्ती चळवळीतील हुतात्म्यांनी केलेल्या महान बलिदानाला अभिवादन करणाऱ्या पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे चित्रण करणाऱ्या 'माय स्टॅम्प'चे प्रकाशनही पंतप्रधान करणार आहेत.  गोवा मुक्ती संग्रामातील विविध घटनांच्या चित्रांचा कोलाज दाखवणारे 'मेघदूत पोस्ट कार्ड'ही पंतप्रधानांना सादर केले जाणार आहे.

सर्वोत्कृष्ट पंचायत/नगरपालिका, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान पुरस्कारांचे वितरण करतील.

पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान, दुपारी 2:15 वाजता, शहीद स्मारक, आझाद मैदान, पणजी येथे पुष्पहार अर्पण करतील.  दुपारी अडीच वाजता ते मिरामार, पणजी येथे नौदलाची परेड आणि हवाई उड्डाण कवायतीला (फ्लाय पास्ट) उपस्थित राहतील.

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782829) Visitor Counter : 224