राष्ट्रपती कार्यालय
ढाका येथील ऐतिहासिक रामना काली मंदिर हे भारत आणि बांग्लादेशच्या लोकांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंधाचे प्रतीक आहे: राष्ट्रपती कोविंद
राष्ट्रपतींनी बांग्लादेश दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी बांग्लादेशमधील भारतीय समुदाय आणि भारतीय मित्रांना संबोधित केले
Posted On:
17 DEC 2021 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2021
बांग्लादेश दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी (17 डिसेंबर 2021) राष्ट्रपती राम नाथ कोविंद बांग्लादेशमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम के दोराईस्वामी यांनी ढाका येथे आयोजित केलेल्या भारतीय समुदाय आणि भारतीय मित्रांच्या स्वागत समारंभाला उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की या भेटीपूर्वी ढाका येथील नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक रामना काली मंदिराचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य त्यांना लाभले. मुक्तिसंग्रामादरम्यान पाकिस्तानी सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांगलादेश आणि भारताच्या सरकारांनी आणि जनतेने मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. या युद्धात मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले. ते म्हणाले की, हे मंदिर भारत आणि बांग्लादेशच्या लोकांमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंधाचे प्रतीक आहे.
भारतीयांच्या हृदयात बांगलादेशला विशेष स्थान असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. प्राचीन नातेसंबंध, सामायिक भाषा आणि संस्कृती यावर आधारित आपले अनोखे संबंध आहेत . दोन्ही देशांच्या समंजस नेतृत्वामुळे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत.
बांगलादेशाची पुरोगामी, सर्वसमावेशक, लोकशाही आणि सामंजस्यपूर्ण समाजाची मूलभूत मूल्ये कायम राखण्यात पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रमुख योगदान असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेल्या मूल्यांना मूर्त रूप देणाऱ्या बांगलादेशच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रपती म्हणाले की,मजबूत अर्थव्यवस्थेच्या दिशेने या प्रवासात बांगलादेशला मदत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि बांगलादेशसोबत भागीदारी करत आहे कारण तो समृद्धीकडे वाटचाल करत आहे. .
बांगलादेशातील भारतीय समुदायाचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की, त्यांनी बांग्लादेशमधील विविध क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी बांग्लादेशच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान देतानाच भारत-बांगलादेश दरम्यान दीर्घकालीन, घनिष्ट द्विपक्षीय संबंधही दृढ केले आहेत.
राष्ट्रपती म्हणाले की, या अनोख्या वर्षात आपण मुक्ती संग्रामाचा सुवर्णमहोत्सव, बंगबंधूंची जन्मशताब्दी आणि आपल्या मैत्रीची 50 वर्षे तसेच भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असतानाच आपल्या राष्ट्रांच्या संस्थापकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण समर्पित भावनेने काम करूया.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782821)
Visitor Counter : 249