पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नैसर्गिक शेतीविषयीच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


“आता देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्ती पर्यंतचा आपला प्रवास नव्या गरजा आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यास अनुकूल अशी कृषीव्यवस्था उभारण्याचा असेल"

आपल्याला आता आपली शेती रासायनिक प्रयोगशाळांतून बाहेर काढत निसर्गाच्या प्रयोगशाळेत न्यायची आहे. जेव्हा मी नैसर्गिक प्रयोगशाळा असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्णपणे विज्ञान-आधारित असा आहे"

"आपल्याला आपले प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे, एवढंच नाही, तर त्यावर नव्याने संशोधन करुन हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवायचं आहे."

“देशातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकाऱ्यांना या नैसर्गिक शेतीचा सर्वाधिक लाभ मिळेल.”

“भारत आणि भारतातील शेतकरी, एकविसाव्या शतकात, ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’म्हणजेच ‘लाईफ’या जागतिक अभियानाचे नेतृत्व करतील.”

“या अमृत महोत्सवात, देशातल्या प्रत्येक पंचायतक्षेत्रातले किमान एक तरी गाव, नैसर्गिक शेतीकडे वळेल असे प्रयत्न करायला हवेत.”

“चला, स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सव काळात, भारतमातेची भूमी रासायनिक खते आणि किटकनाशकांपासून मुक्त करण्याचा संकल्प करुया: पंतप्रधान

Posted On: 16 DEC 2021 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, गुजरातचे राज्यपाल, तसेच उत्तरप्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते. 

आता देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्ती पर्यंतचा 25 वर्षांचा प्रवास, नवी आव्हाने आणि नव्या गराजांच्या अनुकूल शेतीव्यवस्थेत बदल करणारा असावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.गेल्या सहा सात वर्षात, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असे सांगत, पंतप्रधानांनी बियाणापासून ते मालाचे विपणन करण्यापर्यंतच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच किसान सन्मान निधी पासून, ते किमान हमी भाव, उत्पादनाच्या दुप्पट निश्चित करण्यापर्यंत त्यांनी भर दिला. सिंचनाची भक्कम व्यवस्था उभरण्यापासून, ते सर्व दिशांना किसान रेल्वेचे जाळे उभारण्यापर्यंत, अशा सर्व कृषिविषयक सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला. या कार्यकर्मांत सहभागी झालेल्या देशभरातील शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

देशाच्या हरित क्रांतीत रसायने आणि कृत्रिम खतांचा मोठा वाटा होता, यांची दखल घेत पंतप्रधान म्हणाले, की आता आपल्याला या पर्यायी शेतीवरही काम करण्याची गरज आहे.  यावेळी पंतप्रधानांनी रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणामही सांगितले. कृषि क्षेत्राशी संबंधित समस्या अधिकधीक जटील होऊ नयेत, यासाठी वेळेत उपाययोजना करायला हव्यात. "आपल्याला आता आपली शेती रासायनिक प्रयोगशाळांतून बाहेर काढत निसर्गाच्या प्रयोगशाळेत न्यायची आहे. जेव्हा मी नैसर्गिक प्रयोगशाळा असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्णपणे विज्ञान-आधारित असा आहे"असे पंतप्रधान म्हणाले. आज जेव्हा जग अधिकाधिक आधुनिक बनत आहे, त्यावेळी, ते ‘मूलभूत गोष्टींकडे परत जाण्याकडे सगळ्या जगाचा कल आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यांचा अर्थ आपल्या मूळाशी स्वतःला जोडणे. आणि याचा नेमका अर्थ तुम्हा शेतकऱ्यांइतका आणखी कोणाला अधिक समजू शकेलआपण आपल्या मूळांची जेवढी अधिक जोपासना करु, तेवढे आपले रोपटे अधिकाधिक वाढत जाईल. असेही ते पुढे म्हणाले.

आपल्याला आपले प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज आहे, एवढंच नाही, तर त्यावर नव्याने संशोधन करुन, ते अद्ययावत करुन हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या  साच्यात बसवायचं आहे." असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या दिशेने आपल्याला नव्याने संशोधन करावे लागेल, आपल्या प्राचीन ज्ञानाला नव्या स्वरूपात आणावे लागेल, असेही ते म्हणाले.आपल्याला पारंपरिक पद्धतीने जे शहाणपण मिळाले आहे, त्याविषयी दक्ष राहावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. पिकांचे उरलेले अवशेष शेतातच जाळून टाकण्याच्या पद्धतीविषयी बोलताना ते म्हणाले की, शेतात अशी आग लावल्याने, भूमीची सुपीकता नष्ट होते, असे कृषितज्ञांनी वारंवार सांगितले आहे, तरीही या घटना होत राहतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असाच एक गैरसमज म्हणजे, रासायनिक खते –कीटकनाशकाशिवाय शेती चांगली होऊच शकत नाही, खरे तर वस्तुस्थिती याच्या विरुद्ध आहे. पूर्वी जेव्हा आपण रसायनांचा वापर करत नव्हतो, त्यावेळी, आपले पीक अधिक उत्तम येत असे. माणसाच्या  उत्क्रांतीच्या इतिहासाच्या अभ्यासातूनही आपल्याला हे दिसले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्यासोबतच, आपल्याला शेतीत पारंपरिक पद्धतीने शिकलेल्या चुकीच्या पद्धतीही सोडाव्या लागतील असेही ते म्हणाले. शेतीचे ज्ञान कागदोपत्री बंदिस्त न ठेवता, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यात, आयसीएआर, कृषि विद्यापीठे आणि कृषि विज्ञान केंद्रे यांसारख्या संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातल्या 80%  अल्पभूधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा लाभ मिळणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते छोटे शेतकरी, ज्यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. यापैकी बहुतांश शेतकरी रसायनीक खतांवर खूप खर्च करतात. जर ते नैसर्गिक शेतीकडे वळले, तर त्यांची परिस्थितीत सुधारेल, पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी प्रत्येक राज्यांना, प्रत्येक राज्य सरकारला, नैसर्गिक शेती जनचळवळ बनविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या अमृत महोत्सवात प्रत्येक पंचायत क्षेत्रातून किमान एका खेड्यात नैसर्गिक शेती सुरु करण्यात यावी यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणले की हवामानबदल विषयक शिखर परिषदेत त्यांनी जगाला 'पर्यावरणपूरक जीवनशैली' ही जागतिक मोहीम बनविण्याचे आवाहन केले. भारत आणि भारतातले शेतकरी 21व्या शतकात या चळवळीचे नेतृत्व करणार आहेत. चला, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातआपण भारतमातेची जमीन रासायनिक खते मुक्त करण्याची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

गुजरात सरकारने नैसर्गिक शेतीवर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. ही तीन दिवसीय परिषद 14 ते 16 डिसेंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली. या परिषदेला 5000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हजेरी लावली, त्याशिवाय अनेक शेतकरी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या विविध केंद्रातून थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाले होते.

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1782262) Visitor Counter : 459